प्रतिनिधी /बेळगाव
युक्रेन येथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन येणाऱया विमानाचे सारथ्य बेळगावच्या सुनेने केले. मूळच्या शिवबसवनगर येथील दीक्षा आदित्य मण्णूर या पायलट असून, त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या 242 भारतीयांना घेऊन विमानोड्डाण केले. भारतीयांना युक्रेनमधून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱया दीक्षा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बेळगावचे असणारे पद्मजा व प्रल्हाद मण्णूर यांच्या त्या स्नुषा आहेत. दीक्षा व त्यांचे पती आदित्य हे दोघेही सध्या दिल्ली येथे असून ते पायलट आहेत. पद्मजा व प्रल्हाद हे मुंबई येथे वास्तव्यास आहेत. एअर इंडियाच्या विमानाने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यात दीक्षा यांचे महत्त्वाचे योगदान आहे. दीक्षा यांनी न्यूझिलंड येथे जाऊन पायलट प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2017 मध्ये एअर इंडियामध्ये त्यांनी पायलट म्हणून सेवा स्वीकारली.









