फेडररवर मात करणारा सर्गेई रस्त्यांवर घालतोय गस्त
रशियाकडून होत असलेले आक्रमण परतवून लावण्यासाठी चित्रपट कलाकारांपासून अनेक क्रीडापटू देखील स्वतःच्या देशासाठी युद्धभूमीत उतरले आहेत. या लोकांमध्ये टेनिसपटू सर्गेई स्टाखोव्स्कीचा समावेश आहे. 2013 च्या विम्बल्डनमध्ये रॉजर फेडररवर मात करणाऱया सर्गेईने देशाच्या रक्षणासाठी स्वतःची कारकीर्द मध्येच रोखली आहे. सर्गेई आता राजधानी कीव्हच्या रस्त्यांवर सैनिकांचा गणवेश परिधान करून हातात शस्त्र घेत शत्रूला सामोरा जात आहे.
आम्ही तीन ते पाच लोकांच्या गटांमध्ये विभागलेले आहोत. आमच्याकडे एक क्षेत्र असून तेथे आम्ही गस्त घालत आहोत. प्रत्येकाची दोन तासांची शिफ्ट असते, मग 6 तास आराम करतो, मग पुन्हा दोन तासांसाठी बाहेर पडावे लागते असे सर्गेईचे म्हणणे आहे.
युक्रेन युद्धात पराभूत झाल्यास या देशाचे अस्तित्व इतिहासाच्या पुस्तकांमधून संपविले जाईल. हा एक देश म्हणून पृथ्वीवरून गायब होईल. आम्ही रशियन हस्तक आणि लुटारूंना दुकानांमध्ये घुसण्यापासून रोखतो असे सर्गेईने म्हटले आहे.
36 वर्षीय स्टाखोव्स्कीने जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपननंतर टेनिसमधून निवृत्ती घेतली होती. परंतु तो स्थानिक स्पर्धांमध्ये सहभागी होत होता. स्टाखोव्सकी याच्यासह दोनवेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मुष्टियोद्धा वासिली लोमाचेंको आणि टेनिसपटू अलेक्झेंडर डोलगोपोलोव्ह देखील युक्रेनच्या सैन्यात सामील झाला आहे.









