ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान युक्रेनमधील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअरलाईन्सने बोईंग 787 विमान पाठवले होते. एअर इंडियाचे हे विमान युक्रेनमधील 242 प्रवाशांसह मंगळवारी रात्री 11:45 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. मायदेशी परतल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडल्याची भावना यापैकी काही नागरिकांनी व्यक्त केली.
युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या शिवम चौधरीने दिल्ली विमानतळावर सांगितले की, “सध्या युक्रेनमधील परिस्थिती शांततापूर्ण आहे, परंतु तणाव निर्माण होत असल्याचे दिसत आहे. मला घरी परतल्यानंतर चांगले वाटत आहे.”
रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावादरम्यान मायदेशात परत आल्याने आनंद झाला आहे. आता तिथे परिस्थिती सामान्य आहे, पण पालक चिंतेत असल्याने मी परत आले,” असे एका भारतीय विद्यार्थीनीने दिल्लीत उतरल्यानंतर सांगितले.
तत्पूर्वी, एअर इंडियाचे फ्लाइट एआय 1947 ने दिल्लीहून सकाळी 7.30 वाजता उड्डाण केले आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता बॉरिस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरले. गेल्या काही आठवडय़ांपासून युक्रेन आणि रशियामध्ये तणाव वाढत असून भारत सरकारने विमानांची अतिरिक्त उड्डाणं करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनमधील भारतीय दुतावासानुसार युक्रेनच्या किवमधून ते दिल्लीपर्यंत अतिरिक्त विमानांची उड्डाणं केली जातील. 25 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 6 मार्चला विमानांची उड्डाणं होतील. याशिवाय 22 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारीला बोरिस्पिल विमानतळावरून भारतासाठी विमानांची उड्डाणं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









