‘एफएमजीई’ उत्तीर्ण झाल्यास इंटर्नशिप करण्यास अनुमती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाची ठिणगी पडल्यानंतर भारत सरकारने युपेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यात बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे आहेत. मात्र युपेनमधील परिस्थिती पाहता येथील मेडिकलचे शिक्षण सोडून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्मयात आले आहे. त्यावर आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करत युपेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एफएमजीई’ उत्तीर्ण झाल्यास भारतात इंटर्नशिप करण्याची परवानगी देण्याबरोबरच काहींना मेडिकल फी मध्ये सवलत देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.
मेडिकलच्या परीक्षा आणि इंटर्नशिप सोडल्यामुळे आता पुढे काय करायचे असा प्रश्न युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना पडला आहे. भारत सरकारकडून यावर योग्य दिशेने पावले उचलण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने शनिवारी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, युद्ध आणि कोरोनाच्या स्थितीमुळे अनेक विद्यार्थी परदेशातून शिक्षण सोडून भारतात आले आहेत. मात्र, आतापर्यंतची त्यांची मेहनत वाया जाऊ नये म्हणून भारतात त्यांना इंटर्नशिप पूर्ण करता येणार आहे. त्यानुसार भारतात इंटर्नशिपचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी त्यांचा अर्ज ग्राहय़ मानला जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी त्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (‘एफएमजीई’) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे युपेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या नियमांनुसार, परदेशातील विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्ट पास व्हावी लागते. यानंतर त्यांना भारतीय मेडिकल ग्रॅज्युएट समकक्ष म्हणून मान्यता मिळते. त्यामुळे भारतात त्यांना सेवा सुरू करता येते.
इंटर्नशिप फी भरावी लागणार नाही
परदेशातून एमबीबीएस केल्यानंतर परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना देशात इंटर्नशिपसाठी शुल्क भरावे लागणार नाही. तसेच त्यांना भारतीय वैद्यकीय पदवीधरांप्रमाणेच स्टायपेंडही दिला जाणार आहे. आयोगाचे उपसचिव शंभू शरण कुमार यांनी हा आदेश जारी केला. यासोबतच परदेशातून येणाऱया विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या 7.5 टक्के जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. युपेनमधील युद्ध आणि चीनमधील कोरोनामुळे प्रवासावरील बंदी पाहता नॅशनल मेडिकल कमिशनने परदेशातून एमबीबीएस करणाऱया विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.









