युक्रेनमध्ये युद्ध करण्यासोबत रशियाचे सैन्य स्वतःच्या देशासाठी वेठबिगार जमवत आहे. युक्रेनच्या अधिकाऱयांनी रशियाच्या सैन्यावर मारियुपोलमधून 4,500 जणांचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. या नागरिकांना रशियाच्या सैन्याने स्वतःच्या सीमेत नेत त्यांचे पासपोर्ट ताब्यात घेतले आहेत. या लोकांकडून वेठबिगाराच्या स्वरुपात काम करवून घेण्याचा रशियाचा डाव असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.
युक्रेनच्या नागरिकांना आश्रय मागितल्याचा दावा रशियाने पूर्वी केला होता.
रशियाच्या सैन्याने मारियुपोल शहरातील 4 हजार ते 4500 नागरिकांना बळजबरीने नेले आहे. या सर्वांना रशियातील टॅनान्रोग शहरात ठेवण्यात आले असल्याचा दावा मारियुपोल महापौरांचे सहाय्यक पायोत्र आंद्रेयूस्चेंको यांनी केला आहे. परंतु युक्रेनमध्ये युद्धामुळे फैलावलेली अव्यवस्था पाहता आंद्रयूस्चेंको यांच्या दाव्याची पडताळणी करण्याचा कुठलाच मार्ग उपलब्ध नसला तरीही अलिकडेच शहरातून पलायन करणाऱया काही लोकांनी रशियाकडून बळजबरी केले जात असल्याचे म्हटले होते.
मारियुपोल शहरातून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना रशियाच्या रोस्तोव प्रांतातील टॅनान्रोग शहराच्या एका शाळेत ठेवण्यात आल्याचे छायाचित्र रॉयटर्स वृत्तसंस्थेने जारी केले आहे. या सर्व लोकांसाठी शाळेत तात्पुरते निवारा केंद्र निर्माण करण्यात आल्याचा दावा वृत्तसंस्थेकडून करण्यात आला.
आश्रय मागितल्याचा दावा
आंद्रेयूस्चेंकी यांच्या आरोपापूर्वी रशियाच्या नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरचे प्रमुख मिखाइल मिजिनत्सोव्ह यांनी वेगळाचा दावा केला होता. मागील 24 तासांदरम्यान 7,800 युक्रेनियन नागरिकांनी रशियात आश्रय देण्याची विनंती केली होती असे त्यांनी म्हटले होते. रशियाचे सैन्य शहराच्या मध्यभागापर्यंत पोहोचले असून रस्त्यांवर संघर्ष सुरू आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या फिटनेस कॉम्पलेक्समध्ये हजारो लोकांनी आश्रय घेतला होता. याच लोकांना रशियाच्या सैन्याने ताब्यात घेत स्वतःच्या देशात नेल्याचे आंद्रेयूस्चेंको यांनी म्हटले आहे.