आकाराने आणि ताकदीने किरकोळ दिसणाऱया पहिलवानाने धिप्पाड आणि अगडबंब शरीराच्या मल्लाला चीतपट करावे किंवा एखाद्या लहानशा राष्ट्राने एखाद्या बलाढ्य़ देशाचे आक्रमण परतवून लावावे याचे मानवजातीला नेहमीच आश्चर्य वाटत आले, आणि अशा लहानग्यांचे कौतुकही वाटत आले. पहिल्या महायुद्धादरम्यान चिमुकल्या जपानने अवाढव्य रशियाचा पराभव केला होता हे जगाच्या इतिहासाचे अभ्यासक आजही सांगतात. शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या त्या प्रसंगाची एकप्रकारे पुनरावृत्तीच नुकत्याच झालेल्या रशिया- युक्रेन युद्धाच्या रूपाने झाली आहे. जपानने रशियाचा स्पष्टपणे पराभव केला होता त्याप्रमाणे आज जरी या युद्धाचा निर्णय झालेला नसला तरी ज्या धैर्याने युक्रेनने रशियाच्या आक्रमणाला तोंड दिले त्याचे साऱया जगाने कौतुक केले.
आशिया खंडाच्या पूर्वेपासून पश्चिमेला युरोप खंडाच्या भूमीवर हातपाय पसरून पहुडलेला रशिया हा युपेनपेक्षा थोडाथोडका नव्हे तर तब्बल अठ्ठावीस पट मोठा आहे. त्याची औद्योगिक आणि आर्थिक ताकदही मोठी आहे, आणि एकेकाळची अमेरिकेसमोर उभी राहणारी जागतिक महासत्ता असल्याची पार्श्वभूमी त्याच्या अस्तित्त्वाला आहे. अशा अवाढव्य देशाला युपेनसारख्या छोटय़ाशा देशाने महिनाभर झुंजवत ठेवावे ही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच, युपेनने हे कसे साध्य केले त्याचा अभ्यास करण्यासाठी तैवानच्या लष्करी मंत्रालयाने एक खास अभ्यासगट नियुक्त केला आहे. रशियाने आपल्या चिमुकल्या शेजाऱयावर केले तसे आक्रमण उद्या चीनने आपल्यावर केले तर त्याला तोंड कसे द्यायचे याबद्दलच्या तयारीचा एक भाग म्हणून हा अभ्यास केला जाणार आहे, आणि या कामी अमेरिकेचीही मदत घेतली जाणार आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे चीन आणि तैवान या दोघांकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ नांवाने ओळखले जाणारे चीनचे लष्कर आणि तैवानची फौज या युद्धाकडे लक्ष ठेवून आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्याला सामोरे जाताना युपेनने पाश्चात्य राष्ट्रांकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रांचा वापर केला. त्यांत रणगाडाविरोधी आणि विमानविरोधी क्षेपणास्त्रांची महत्त्वाची भूमिका होती. पाश्चात्य देशांकडून मिळालेल्या या शस्त्रास्त्रांमुळेच युपेन अवाढव्य रशियाला भारी पडत आहे, असे मत तज्ञांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेन आणि तैवान यांच्या लष्करी शक्तीचीही तुलना केली जात आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्या फौजांच्या आकाराची तुलना करता येणार नाही तशीच तैवान आणि चीनच्या लष्करांचीही करता येणार नाही. सध्या जगात सर्वात शक्तिशाली लष्कर अमेरिकेचे, त्यापाठोपाठ रशियाचे, तिसऱया क्रमांकावर चीनचे आणि चौथ्या क्रमांकावर भारताचे आहे अशी क्रमवारी ‘ग्लोबल फायर पॉवर’ या संकेतस्थळावर दिली आहे. त्यानुसार तैवान एकविसाव्या आणि युक्रेन बाविसाव्या क्रमांकावर आहेत. मात्र एका अंकाने तैवान पुढे असला तरी शक्ती निर्देशांकाचा विचार करता तो या वषी खाली गेला आहे. शेवटी देशाचा आकार (क्षेत्रफळ) आणि लोकसंख्या हे घटक लष्कराच्या लहानमोठय़ा आकाराबाबत प्रथम परिणामकारक ठरतातच. युपेन आणि तैवान यासारखे लहान देश वाढवून वाढवून सैन्य किती वाढवणार? मग या आकाराची जागा प्रगत तंत्रज्ञान आणि नव्यात नवी सामुग्री यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. आजच्या युगात एखादा देश लष्करीदृष्टय़ा अद्ययावत नसणे म्हणजे शत्रुराष्ट्रांकडून कमजोर लेखले जाणे होय, आणि अशा देशांना आक्रमणाचा धोका असतो.
‘फॉर्ब्स’ या जगप्रसिद्ध संस्थेच्या जुलै 2021 मधील म्हणजे नऊ महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, तैवानने अमेरिकेकडून 130 कोटी डॉलर किमतीचे ‘एम-1’ बनावटीचे 108 नवे रणगाडे खरेदी केले. या संस्थेच्या अंदाजाप्रमाणे चीनच्या रणगाडय़ांपेक्षा तैवानचे रणगाडय़ांचे दल जास्त ताकदीचे आहे. चीनने आक्रमण केले तर तैवानी रणगाडे महत्त्वाची भूमिका बजावतील असे ‘फॉर्ब्स’ला वाटते. एवढेच नव्हे तर चिनी आरमार तैवानची सामुद्रधुनी ओलांडू लागले की तैवानी पाणसुरुंग, टॉर्पेडो आणि क्षेपणास्त्रांनी ते हैराण होईल, असेही ‘फॉर्ब्स’ला वाटते.
चीन आपल्यावर आक्रमण करील असे तैवानला का वाटते? याचे कारण चीनी साम्यवादी क्रांतीच्या इतिहासात सापडते. माओ झेडाँग यांच्या 1949 मधल्या साम्यवादी क्रांतीच्या वेळी चीनचे तत्कालीन शासक चँग कै शेक यांनी पूर्व समुद्रातील फार्मोसा बेटावर आश्रय घेतला आणि तिथे सत्ताही स्थापन केली. चीनने ‘पीपल्स रिपब्लीक ऑफ चायना’ हे नांव धारण केले तर चँगने आपल्या राज्याचे ‘रिपब्लीक ऑफ चायना’ असे बारसे केले. फार्मोसा बेटाला ‘तैवान’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र हा देश मूळ भूमीचा भाग आहे आणि तो पुन्हा जोडला पाहिजे अशी चीनची धारणा आहे.
तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळविल्यानंतर दोनच दिवसांनी चीनने तैवानच्या परिसरात गोळीबाराचा ‘सराव’ केला होता. त्यापूर्वी, एप्रिल महिन्यात तैवान आणि अमेरिका यांच्यात नवीन लष्करी करार झाला होता, त्याला आता एक वर्ष पूर्ण होईल. युपेनमधील काही प्रदेश ‘आपला’ आहे असे रशियाने आक्रमणाचे समर्थन केले, त्याच धर्तीवर तैवान ही आमचीच भूमी आहे असे म्हणून चीनही आपल्यावर हल्ला करू शकतो असे तैवानी जनतेला वाटते. एकीकडे चीन लष्करी ताकद वाढवत आहे, दुसरीकडे तैवान हल्ल्याला तोंड देण्याची तयारी वाढवत आहे. तैवानच्या हवाई आणि नाविक लष्करी कवायती सुरूही झाल्या आहेत. तैवानचे संरक्षण मंत्री चिउ क्मयुओ चेंग म्हणतात, ‘चीनबरोबर युद्ध म्हणजे चारी बाजूंनी कोसळलेल्या संकटाची अवस्था असेल आणि त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. मात्र साऱयांनाच त्या युद्धाची झळ पोहोचेल. हे खरेच आहे. चीनच्या तैवानवरील संभाव्य आक्रमणाची शक्मयता लक्षात घेऊन जपानने सावधगिरी म्हणून आपल्या लष्करी सज्जतेत वाढ करण्याचे काम हाती घेतले. कदाचित दक्षिण चीनी समुद्राच्या घेऱयात असणारे फिलिपीन्स आणि व्हिएतनाम हे देशही त्यात ओढले जाऊ शकतात. त्याची झळ भारतालाही पोहोचण्याची भीती आहे.
राजेंद्रप्रसाद स. मसुरकर









