वृत्तसंस्था / मेलबर्न
येथे ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेला 17 जानेवारीपासून प्रारंभ होत असून पुरूष आणि महिलांच्या एकेरी प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्यासाठी पात्र फेरीची स्पर्धा खेळविली जात आहे. भारताच्या युकी भांब्रीने या पात्र फेरीच्या स्पर्धेत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. मात्र भारताच्या रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना यांचे आव्हान संपुष्टात आले.
मंगळवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात युकी भांब्रीने पोर्तुगालच्या डॉम्निगेसचा 68 मिनिटांच्या कालावधीत 6-4, 6-2 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. मात्र भारताच्या रामकुमार रामनाथनचा पहिल्या फेरीत इटलीच्या मोरोनीने 6-3, 7-5 असा पराभव केला. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात युक्रेनच्या लिसा सुरेंकोने भारताच्या अंकिता रैनाचे आव्हान 6-1, 6-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले. पुरूष विभागात भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरनने याआधीच दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला आहे.









