नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशा स्थितीत रूग्णांना बेड , ऑक्सिजन वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. अशा स्थितीमध्ये बिहारच्या एका गावामध्ये एका आरोग्य केंद्रात रुग्णांऐवजी चक्क गायी बांधण्यात आल्याचे समोर आला आहे.
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा संकटाच्या काळात बिहार मधुबनीच्या खाजौलीतील सुक्की गावात सरकारी आरोग्य केंद्रात चक्क गायी बांधण्यात आल्या आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोग्य केंद्रात गेल्या २० वर्षापासून गोशाळा चालवण्यात येत आहे. गावातील लोकांना आरोग्यासंदर्भातील समस्या असतील तर खाजगी रुग्णालयात जावे लागते. बिहारच्या या चार हजार लोकसंख्या असलेल्या गावात काही कोरोनाबाधितांनी तर स्वखर्चाने घरीच स्वतःवर उपचार केले आहेत असे गावकऱ्यांनी सांगितले. या आरोग्य केंद्रात नेमणूक करण्यात आलेले आरोग्य कर्मचारी कोरोनामुळे खजौली येथील प्राथमिक रुग्णालयात काम करत असल्याचे देखील गावकऱ्यांनी सांगितले. यासोबतच या आरोग्या केंद्राला गेल्या वर्षापासून कोणत्याही आरोग्य अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याचे देखील एका गावकऱ्याने सांगितले.