- या संदर्भात लवकरच तयार होणार कायदा
ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशातील शिवराज सरकारने सरकारी नोकऱ्यांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील सर्व सरकारी नोकऱ्या आता केवळ स्थानिकांसाठीच असतील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज केली तसेच लवकरच या संदर्भात कायदा करण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटर वर एक व्हिडियो शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले की, आज मध्य प्रदेश सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रदेशातील सर्व सरकारी नोकऱ्या केवळ राज्यातील स्थानिकांनाच दिल्या जातील. यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर तरतूद केली जात आहे. राज्यातील संसाधनांवर राज्यातील मुलांचाच अधिकार आहे, असे म्हटले आहे.
शिवराज सिंह यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली यामध्ये त्यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी केलेल्या घोषणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.









