ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यात यावी, या मागणीसह मनसेने सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माजी नगरसेवक संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत यांच्यासह आज सकाळीच लोकलमधून विनापरवानगी लोकल प्रवास केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल रेल्वे प्रवास सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फार हाल होत आहेत, त्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अन्यथा 21 सप्टेंबरला सविनय कायदेभंग आंदोलन करू असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला होता. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी आज लोकलने प्रवास केला.
- ठाण्यात अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
तर दुसरीकडे ठाणे स्टेशनवर पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. ठाणे स्टेशनवर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे देखील लोकलने प्रवास करण्यासाठी आले असता त्यांना पोलिसांनी अडवले आहे. मात्र, अविनाश जाधव आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यावेळी जाधव म्हणले, मी त्यांना विनंती करतो. मला प्रवास करण्याची परवानगी द्या. त्यानंतर हे आंदोलन थांबेल. तसेच सर्व सामन्यांना कामावर जाण्यासाठी लोकल प्रवास सुरू करण्यात यावा अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. मात्र, लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी अडवले आणि त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या ठाण्यात पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, सविनय कायदेभंगाच्या इशाऱ्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दादर रेल्वे पोलिस स्टेशन आणि मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ही नोटीस पाठवली आहे. तसेच, रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे या नोटीसमध्ये सांगण्यात आले होते. परंतु तरीही संदीप देशपांडे यांनी काही कार्यकर्त्यांसह लोकलमधून प्रवास केला.









