ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपुरमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे तीन म्युटेशन आढळून आले आहेत. निरी या संशोधन संस्थेच्या अहवालात बी.1.1. 529, बी 1 आणि बी 2 या तीन म्युटेशनची नोंद झाली आहे.
निरीच्या संशोधनाच्या चौथ्या टप्प्यात 89 नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यामध्ये 66.2 टक्के ओमिक्रॉनच्या बी 2 चे नमुने आढळले, 31.5 टक्के बी.1.1.529 चे आणि 2.3 हे बी.1 चे नमुने आढळले. त्यामुळे नागपुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, बी. 2 हा म्युटेंट घातक असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, युनायटेड किंग्डममधील आरोग्य अधिकारी बी.2 चा तपास करत आहेत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटचे तीन स्ट्रेन किंवा सब लीनिएज आहेत बीए.1, बीए.2 आणि बीए.3. त्यामधील बीए.2 या स्ट्रेनचे प्रकार आतापर्यंत डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, भारत आणि सिंगापूर येथे यापूर्वीच आढळले आहेत.








