ऑनलाईन टीम / तरुण भारत
10 मार्च रोजी पाच राज्यातील विधानसभा निकालाअंती राष्ट्रीय काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याची दखल घेत मंगळवारी, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर या पाचही राज्यांतील प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. या गच्छंतीतून संघटनात्मक बदलाचे संकेत दिले गेले आहेत.
पाच राज्यांच्या नामुष्कीजनक पराभवानंतर रविवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची साडेचार तास बैठक झाली होती. सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची तसेच, आवश्यक संघटनात्मक बदल करण्याचीही विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पाचही प्रदेशाध्यक्षांना पायउतार होण्यास सांगण्यात आले असून या निर्णयाची माहिती प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीटद्वारे दिली.
उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय लल्लू व पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू या दोघांना स्वत:च्या मतदारसंघातही विजय मिळवता आलेला नाही. नवज्योतसिंह सिद्धू यांना आठ महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष केले गेले होते. पण, अंतर्गत मतभेदांमुळे पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. यशिवाय, उत्तराखंड, गोवा व मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष अनुक्रमे गणेश गोडियाल, गिरीश चोडणकर व एन. लोकेन सिंह यांनाही पद सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.
यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय काँग्रेसला आत्मपरिक्षण करुन पक्षाच्या अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत वाद सुरु ठेवायचा कि, सामान्य जनतेचे प्रश्न समजुन घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावयाचे हे ठरवणे क्रमप्राप्त ठरले आहे. तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख विरोधी पक्ष अंतर्गत बळकटीसाठी एकजूटीने प्रयत्न करत असताना राष्ट्रीय काँग्रेसचा अंतर्गत गटबाजी कमी होण्याऐजी दिवसें – दिवस वाढत आहे. याच कारणामुळे विरोधी पक्षी ही याचा लाभ उठवत आहेत. तर सामान्य जनता या 100 हुन अधिक वर्षे जुना असलेल्या पक्षातील उफऴलेल्या वादाला कंटाळली आहे.