ऑनलाईन टीम / मुंबई
अठरा वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लसीकरण करण्याबाबत राज्यसरकारचा कोणता ही निर्णय होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेली घोषणा अयोग्य आहे. त्याचबरोबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट केलं होतं पण नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. हा केवळ श्रेय घेण्यासाठी चाललेला खटाटोप असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं.
केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षांच्या पुढील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत योग्य नियोजन करत लसीकरणाचा हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. कारण या पूर्वी ४५ वयोगटापर्यंतच्या नागरिकांना लस देताना अनेक ठीकाणी गर्दी झालेली होती . आणि आता तर युवक वर्ग लसीकरणासाठी बाहेर पडणार असल्याने ती काळजी घेणं आवश्यक असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक काय म्हणाले होते ?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील जनतेचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली होती. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले होते.
आदित्य ठाकरे यांचे काय होतं ट्विट
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मोफत लसीकरणाविषयी माहिती दिली होती. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी आदित्य यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.