ऑनलाईन टीम / लुधियाना :
बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिलला कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी पंजाब पोलिसांनी जिमी शेरगिलला लुधियाना येथून त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितनुसार, जिमी शेरगिल लॉकडाउनचे नियम झुगारुन तो चित्रपटाचे शूटिंग करत होता. शिवाय ज्या ठिकाणी त्याचे शूटिंग सुरु होते, तिथे कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंग फॉलो केले जात नव्हते. अनेकांनी मास्क देखील लावले नव्हते. परिणामी लॉकडाउनचे नियम मोडल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
लुधियानामधील एका शाळेत चित्रपटाचं शूटिंग सुरु होते. तेथील काही लोकांनी पोलिसांना या शूटिंग बाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी शाळेत पोहोचले. अन् तिथे खरोखरच एका पंजाबी चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. निर्मात्यांनी त्या ठिकाणी कोर्टाचा सेट लावला होता. विशेष म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सनी देखील मास्क लावले नव्हते. सोशल डीस्टंसिंगचे नियम देखील मोडले होते.
परिणामी पोलिसांनी अभिनेता जिमी शेरगिल सकट तेथील सर्वांना अटक केली. निर्मात्यांच्या मते विशेष परवानगी घेऊनच त्यांनी चित्रीकरणाला सुरुवात केली होती. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. याबाबत माहिती देताना पोलीस म्हणाले की, जिमी शेरगिल आणि सहकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.









