प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर येथे कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्याने त्याबाबत टास्क फोर्स नेमण्यात आला होता. या टास्क फोर्सने आपला अहवाल स्पष्ट केला असून कोल्हापूरच्या वाढत्या मृत्यूदराबाबत महत्त्वाची तीन कारणे स्पष्ट केली आहेत.
या बाबत पहिले कारण म्हणजे टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोल्हापुरात अनेक कोरोनाबाधित रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच घरी त्रास वाढू लागल्यानंतर अनेक रुग्ण हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहे. मात्र तोपर्यंत बराच कालवधी निघून गेलला असतो. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे.
दुसरे कारण म्हणजे कोल्हापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा बेफिकीरपणा कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग गावागावात झपाट्याने पसरु लागला आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील कोव्हिड सेंटर कमी पडत आहेत. तसेच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन या सुविधाही कमी पडत आहे. त्यामुळेही मृत्यूदरात वाढ होत आहे.
तिसरे कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालय सध्या हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू होत आहे, असेही कारण टास्कफोर्सने दिले आहे.
कोल्हापुरातील टास्क फोर्सने दोन दिवस जिल्ह्यामध्ये रुग्णालयांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील करोना मृत्यूदर कमी करण्यासाठी काही तपशील गोळा केला. तसेच कोल्हापुरातील छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालय (सीपीआर) व इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाची पाहणी केली.
टास्कफोर्सकडून सूचना
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मृत्यूदर वाढत असल्यामुळे प्रशासनासमोर मोठी चिंता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 15 दिवसातील कोरोना मृत्यूचा दर 30 ते 40 टक्क्याने कसा कमी करता येईल, याबाबत सूचना दिली जाणार आहे. तसेच टास्क फोर्सकडून यावर सुधारणा सुचवण्यात येणार आहे.








