ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पात काहीच नवीन नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले, या अर्थसंकल्पातून पूर्ण निराशा झाली आहे. यामधून प्रामाणिक शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. मूळ कर्जमाफी योजनेतून 45% शेतकरी वंचित राहीले आहेत. त्यांना एक नव्या पैशाची देखील मदत झालेली नाही. ठाकरे सरकारची शेतकऱ्यांसाठीची ही घोषणा फसवी ठरली आहे. 3 लाख कर्जाच्या वर 0% व्याज ही फसवी योजना आहे. महाराष्ट्रात 80 टक्के शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची मर्यादाच 50 हजार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
- हे राज्य सरकारचे बजेट होती की मुंबई महापालिकेचे ?
पुढे ते म्हणाले, सगळ्या ज्योतिर्लिंगांकरता सुधीर मुनगंटीवार यांनी आधीच पैसे दिलेले आहेत. जी कामे चालू आहेत, तीच दाखवण्यात आली. हे राज्य सरकारचे बजेट होती की मुंबई महापालिकेचे, असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच मुंबई महापालिकेच्या योजनेसाठी राज्य सरकार कधी पैसे देत नाही. नव्याने इन्फ्रास्ट्रक्चरचे कुठलेही प्रकल्प जाहीर केले नाहीत, अशी टीका ही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरचा एका पैसाही कमी केला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल 10 रुपये महाग आहे कारण राज्य सरकारचा कर जास्त आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.