प्रतिनिधी/ बेळगाव :
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयात असणारा पाणीसाठा यंदा पुरेसा असून, यावर्षी पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावषी 5 फूट पाणी अधिक असून, उन्हाळय़ातील संभाव्य पाणी टंचाईची झळ यंदा जाणवणार नाही, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांच्यादृष्टीने ही दिलासादायक बाब ठरणार आहे.
मागील वषी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बेळगावला पाणीपुरवठा करणाऱया हिडकल आणि राकसकोप या दोन्ही जलाशयांच्या पाणीसाठय़ात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे यावषीचा उन्हाळा सुसहय़ ठरेल, अशी अपेक्षा आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयात सध्या असणारा पाणीसाठा 2462 फूट इतका आहे. मागील वषीच्या तुलनेत हे प्रमाण 5 फुटापेक्षा अधिक आहे. हिडकल जलाशयातील पाणीदेखील पुरेसे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यंदाच्या मोसमात वळीव सरींचा जोरदार मारा सुरू झाला आहे. त्यामुळे शहर परिसरात उष्म्याची तीव्रता कमी झाली आहे. यंदाचा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शहरवासियांना किमान पाणी पुरवठय़ाच्या बाबतीत समाधानकारक परिस्थिती असेल, असा दिलासा मिळतो आहे.









