दलित संघटनेकडून माजी आमदार संजय पाटील यांचा निषेध
प्रतिनिधी /बेळगाव
महिला ही कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा जाती-धर्माची असो तिचा अवमान करणे हे घटनाबाह्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी विशेष कायद्यात तरतूद केली आहे. असे असताना माजी आमदार संजय पाटील यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात जे वक्तव्य केले आहे त्याचा जाहीर निषेध करत दलित संघटनांनी तीव्र आंदोलन केले. यापुढे कोणीही महिलेचा अपमान केला तर बहुजन हा अपमान सहन करणार नाहीत. अपमान करणाऱयांना रस्त्यावरच धडा शिकवला जाईल, असा इशारादेखील दिला आहे.
या निषेधाबरोबरच केंद्र व राज्य सरकारने दलितांसाठी असलेल्या एससीपी आणि टीएसपी या योजना योग्यप्रकारे राबविल्या नाहीत. त्यामुळे त्याचाही जोरदार निषेध यावेळी नोंदविण्यात आला. एससीएसटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्येही कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बहुजनांविरोधातच अजेंडा राबविला आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, देशामध्ये एका तासाला एका दलितावर अन्याय होत आहे. दलित तरुणी व महिलांवर अत्याचार होत आहेत.
त्यामुळे दलित हे असुरक्षित झाले आहेत. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहे. माजी आमदार संजय पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली आहे. कर्नाटक दलित संघर्ष समिती, डॉ. आंबेडकर वाद संघटनेचे संचालक सिद्धाप्पा कांबळे, जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा चौगुले, जितेंद्र कांबळे, शशी साळवे, संगीता पाटील, अशोक लाखे यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









