प्रतिनिधी / नागठाणे :
देवी-देवतांच्या यात्रा भरविण्याबाबत जिल्हाधिकायांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली असतानाही त्याचे पालन न करता यात्रा भरविल्याबाबत भाटमरळी (ता.सातारा) येथील जवळपास 200 जणांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकायानी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर धार्मिळ स्थळे व प्रार्थनास्थळे यांसंदर्भात नुकतीच मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. मात्र, असे असतानाही गुरुवारी रात्री भाटमरळी येथे ग्रामदेवता मंगळाई देवीची वार्षिक यात्रा भरविण्यात आली. यावेळी रात्री उशिरा देवीचा जोगवा मागण्याचा कार्यक्रमानिमित्ताने मोठी गर्दी झाली होती. यावेळी बोरगाव पोलिसांनी गावातील ज्योतिराम संपत चव्हाण, मनोज सुरेश पवार, अक्षय शहाजी जाधव, ऋतिक दिलीप जाधव, सुशांत सुरेश पवार यांच्यासह सुमारे 150 ते 200 जणांविरुद्ध कोविड-19 च्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भा.द.वि.स. कलम 269,188, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51(ब), महाराष्ट्र कोविड अधिसूचना नियम 11 व साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास हवालदार राजू शिंदे करत आहेत.









