ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या कारवाईवरुन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर रोज नवनवे आरोप करत आहेत. मलिक यांनी वानखेडेंच्या धर्माबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर मध्यरात्री मलिक यांनी वानखेडेंचा मुस्लिम वेशातील फोटो ट्विट केला आहे. हा फोटो वानखेडेंच्या निकाहच्या वेळेसचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
वानखेडे यांनी मुस्लीम असल्याचे लपवत खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे आरक्षणाअंतर्गत आयआरएसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी यापूर्वीच केला होता. हा वाद आता मुंबई हायकोर्टात सुरू आहे. याच आरोपांचा पुरावा म्हणून मलिक यांनी वानखेडे यांचा कथित स्वरुपामधील निकाहनाम्यावर स्वाक्षरी करताना फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये मलिकांनी अधिक स्पष्टीकरण दिले नाही. ‘कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.
दरम्यान, मलिकांनी शेअर केलेल्या या फोटोमुळे एकच खळबळ उडाली असून, समीर वानखेडे याबाबत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.