सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सांगली येथे राहणारे ५६ वर्षांचे दादासाहेब पाटील यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल मध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. एका ३१ वर्षीय तरुणाच्या मृतदेहातून हे हृदय काढण्यात आले हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे सर्जन डॉ. संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखालील अपोलोच्या विशेष तज्ज्ञांच्या पथकाने अपोलो हॉस्पिटल मध्ये पाटील यांच्यावर या हृदयाचे प्रत्यारोपण यशस्वीपणे केले. हा रुग्ण इस्केमिक डायलेटेड कार्डिओमायोपॅथी ने ग्रस्त होता; याचा अर्थ, त्याच्या हृदयाची रक्ताभिसरणाची क्षमता कमी होती आणि त्यामुळे त्याची हृदयक्रिया बंद पडण्याच्या बेतात होती. नवीन ह्रदय बसवणे हाच या रुग्णाच्या आयुष्याची दोरी बळकट करण्याचा एकमेव मार्ग होता.
अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई येथील हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे सर्जन डॉ. संजीव जाधव म्हणाले, हा रुग्ण ८ महिन्यांपूर्वी
आमच्याकडे बायपास शस्त्रक्रियेसाठी आला. तपासणीदरम्यान असे आढळून आले की त्याच्या हृदयाचे कार्य केवळ २५ टक्के इतकेच सुरू होते. त्या काळात कोविड परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही आम्हाला मुंबईतील रक्तदात्याबद्दल माहिती मिळाली, त्या वेळी ग्रीन कॉरिडॉर तातडीने कार्यान्वित करण्यात आला. दात्याचे हृदय काढून घेण्यात आले, ते अपोलो हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले व त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. कार्डिओ थोरॅसिक व व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. शांतेश कौशिक, सीव्हीटीएस सर्जन डॉ. सचिन सणगर, सीव्हीटीएस डॉ. कमल सिंग, इन्टेन्व्हिस्ट डॉ. गुणाधर पधी, इन्टेन्व्हिस्ट डॉ. हरिदास मुंडे आणि इन्टेन्व्हिस्ट डॉ. सौरभ तिवारी या तज्ज्ञांच्या पथकाची डॉ. संजीव यांना साथ लाभली.
Previous Articleकोल्हापुरात माध्यमिक शिक्षण अधिकाऱयांच्या त्या आदेशाची होळी
Next Article अभेपुरीत ‘त्या’ वृद्धेचा मृतदेह आढळला विहिरीत








