योजना पुन्हा लागू करण्याचा विचार सुरू : बीपीएलधारकांना 5 लाखांपर्यंत मिळत होती मदत
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य सरकारची प्रमुख आरोग्य योजना म्हणजे यशस्वीनी होय. ही योजना मध्यंतरी स्थगित करण्यात आली होती. ग्रामीण भागातील लोकांसाठी विशेषतः शेतकऱयांसाठी महत्त्वाची असणारी ही योजना पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे. सरकारने 31 मे 2018 मध्ये आरोग्य कर्नाटक योजना सुरू केली. परंतु सहकार खात्याने ती बंद केली व ही योजना ‘आयुष्मान भारत’मध्ये विलीन
करण्यात आली.
या योजनेतून बीपीएल कार्डधारकांना 5 लाखांपर्यंतची मदत मिळत होती. तथापि, खासगी रुग्णालयात उपचार घ्यावयाचे असल्यास सरकारी हॉस्पिटलमधून तसे पत्र आणणे बंधनकारक आहे. हा आयुष्मान भारत योजनेतील मोठा अडथळा आहे. यशस्वीनी योजना 2003 मध्ये सुरू करण्यात आली. प्रारंभी ती ग्रामीण भागात सुरू केल्यानंतर 2014 मध्ये शहरी भागासाठी सुरू करण्यात आली.
यशस्वीनी योजना ही देशभरातील स्वनिधी असणारी सर्वात मोठी आरोग्य योजना होती. या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती कोणत्याही सहकारी सोसायटीचा सदस्य असणे आवश्यक होते. या योजनेंतर्गत सरकारी किंवा खासगी रुग्णालयात 823 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात होत्या.
सद्यस्थितीत रुग्णांना मोठय़ा शस्त्रक्रियेची गरज भासू शकते, ती त्यांना सरकारी रुग्णालयातून मिळत नाही. अशावेळी खासगी रुग्णालयात उपचार किंवा शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी सरकारी हॉस्पिटलमधून पत्र घ्यावे लागते. परंतु यशस्वीनी योजनेसाठी अशी परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे यशस्वीनी योजना पुन्हा लागू करावी, अशी मागणी होत असून त्याबाबत सरकार विचाराधीन आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार
6या योजनेंतर्गत ग्रामीण भागात दरवर्षी 2 लाखपर्यंतची तर शहरी भागात दरवषी 2.5 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळत होती. जे लोक विम्याचे हप्ते भरतात, तेच भांडवल म्हणून या योजनेत वापरले जात होते. सदर योजना पुन्हा सुरू करताना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी सरकारला काही सल्ले देण्यात आले आहेत. शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही करण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी म्हटले आहे.









