शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती; जिल्हा परिषदेकडून जय्यत तयारी
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्हा परिषद आवारातील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवार दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या निमित्ताने पोलीस परेड ग्राऊंडवर जाहीर सभेचे आयोजन केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने जय्यत तयारी केली आहे. यावेळी पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याच्या बांधकामाचा शुभारंभही करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी दिली.
पुतळा अनावरण आणि पवारांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद इमारत परिसराची स्वच्छता करण्यात आली असून पुतळ्याच्या चबुतर्या सभोवती आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई केली आहे. आकर्षक फुलांनी पुतळ्याला सजवण्यात आले आहे. जिल्हा परिषद इमारती समोरली रस्ता डांबरीकरण करुन चकाचक करण्यात आला आहे. सकाळी अकरा वाजता पवार यांच्या हस्ते पुतळा अनावरण व स्लॅब कोनशिला अनावरण असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमास पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार संभाजीराजे छत्रपती, धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे, चंद्रकांत जाधव, प्रकाश आबिटकर, पी. एन. पाटील, राजेश पाटील, अरुण लाड, जयंत आसगावकर, राजू आवळे, ऋतुराज पाटील, यांच्यासह जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रविण यादव, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, महिला बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे आदी प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.