देवराष्टे / वार्ताहर
यशवंतरावांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. आज जो महाराष्ट्र उभा आहे त्यामध्ये यशवंतरावाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या विचारानेच महाराष्ट्राची यशवंत वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघरास त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कॉग्रेसचे प्रभारी एच. के.पटेल, मंत्री सतेज पाटील, कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी कॉग्रेसचे प्रभारी एच.के.पटेल म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडित आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला.
मंत्री सतेज पाटील म्हणाले, आज कोणत्याही क्षेत्रात, राष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडींत महाराष्ट्राचे वेगळेपण देशात उठून दिसते. हे वेगळेपण विकसित होण्यामध्ये आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाण्याचे चित्र निर्माण होण्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे अमूल्य योगदान आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकातील त्यांचा जीवनपट पाहून आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळाली. यावेळी सांगली शहरचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मंगेश चव्हाण ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Previous Articleसाकीनाका बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी
Next Article कणकवली शहरातील सहा दुकानगाळे चोरट्यांनी फोडले









