ऑनलाईन टीम / यवतमाळ :
यवतमाळ विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांचा पराभव केला आहे.
विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारी रोजी 100 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार, भाजपच्या उमेदवारासह आणखी चार अपक्ष उमेदवार रिंगणात होते. नंतर चारही अपक्षांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत झाली होती.
जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपरिषदा, नगर पंचायतींचे सदस्य आणि 16 पंचायत समित्यांचे सभापती मिळून एकूण 489 मतदारांनी यासाठी मतदान केले होते. त्याची मतमोजणी आज झाली. यामध्ये चतुर्वेदी यांना 298 मते मिळाली. तर बाजोरिया यांना 185 मते मिळाली. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मतदारांकडून एकजुटीची शपथ घेतली होती.