प्रतिनिधी /बेळगाव
सौंदत्ती यल्लम्मा डोंगर परिसरात रविवारी सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने हिंदू देवदेवतांच्या भग्नप्रतिमा जमविण्याबरोबरच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ, लिंगय्या बुर्लकट्टी, बाळू कणबरकर, महेश रेड्डी, गौरीश हिरेमठ, आनंद भातकांडे, शिवु बुर्लकट्टी आदी कार्यकर्त्यांनी या उपक्रमात भाग घेतला होता. कोरोना महामारीमुळे तब्बल 18 महिने देवीचे दर्शन बंद होते. डोंगरावर दर्शनासाठी येणाऱया अनेक भाविकांनी आपल्या घरातील भग्नप्रतिमा डोंगर परिसरात सोडून दिल्या होत्या. ठिकठिकाणी पडल्याही ठेवण्यात आल्या होत्या. सध्या दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर गर्दी होत आहे. देवदेवतांच्या प्रतिमांची विटंबना टाळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे वीरेश हिरेमठ यांनी सांगितले.









