आमदार अनिल बेनके : आरटीओ कार्यालयातील पोस्टशाखेचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथील आरटीओ कार्यालय यमनापूर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. सध्या कार्यालयासाठी 4 एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. त्या ठिकाणी हे कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार असून सध्या इमारतीसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. कणबर्गी येथेही परवानगीसाठी घेण्यात येणारे ट्रायल मैदान तयार झाले आहे. तेही लवकरच आरटीओ कार्यालयाकडे सोपविण्यात येणार असून त्याचा उद्घाटन समारंभ लवकरच करण्यात येणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
नुकताच आरटीओ कार्यालयात पोस्ट शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी वरील विचार व्यक्त केले. व्यासपीठावर आरटीओ शिवानंद मगदूम, एम. के. कोत्तल, आर. के. उमराणी होते. यावेळी बेनके यांनी मागील दोन-तीन वर्षांपासून पोस्ट शाखा उभारणीसाठी प्रयत्न सुरू होते. आरटीओ शिवानंद मगदूम यांनीही पोस्ट शाखा कार्यालयात स्थापन करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. आता कार्यालयात पोस्ट शाखेचे उद्घाटन झाले असून अनेकांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.
यावेळी आरटीओ मगदूम यांनी ही शाखा स्टॅम्प, ज्या नागरिकांना लायसन्स व इतर कागदपत्रे वेळेत मिळत नव्हती त्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यापुढे थेट नागरिकांच्या घरापर्यंत कागदपत्रे व इतर सर्व आरटीओशी संबंधित असणारे लायसन्स घरपोच होतील. नागरिकांनी आपला पत्ता व पिनकोड व्यवस्थित देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
सुरुवातीला मान्यवरांचा परिचय करून दिल्यानंतर आमदार अनिल बेनके यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी कचेरी अधिकारी शरणाप्पा हुग्गी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक शीतल कुलकर्णी यांनी केले. आभार आरटीओ शिवानंद मगदूम यांनी मानले.









