अध्याय सातवा
भगवंत उद्धवाला उपदेश करताना म्हणाले, स्वर्ग, नरक, कर्म, ब्रह्म या सगळय़ाची प्राप्ती मनुष्य देहातच शक्मय आहे म्हणून पापकर्म टाळून मोक्षधर्म धरावा असा विवेक ज्यांच्याकडे आहे ते वैराग्याची कास धरतात आणि हे ज्यांना कळले ते स्वतःच स्वतःचे गुरु होतात. मग त्यांच्या बुद्धीत मी ज्ञानज्योतीचा प्रकाश पाडतो. त्या प्रकाशामुळे त्याना बोध होतो. ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला मी पावतो. विवेकाच्या योगाने अंतःकरण निर्मळ झाले म्हणजे नरदेहात आत्मा प्रत्यक्ष भासू लागतो. उद्धवा याविषयी बिलकुल संदेह बाळगू नकोस. येथे केवळ बुद्धी निर्मळ हवी म्हणजे आत्मबोध तत्काळ होऊन नरदेह सफळ होतो. याबाबत मी तुला यदु आणि अवधूत यांचा जो संवाद झाला त्याची माहिती देतो. लक्षपूर्वक ऐक. भगवंत पुढे म्हणाले, क्षात्रसृष्टीत सूर्यासमान असलेला आणि क्षात्रतेजाने तळपणारा आणि प्रजेसाठी चंद्रासम शीतल असलेला यदु म्हणून एक आमचा पूर्वज होता. त्याने अवधुतांशी ब्राह्मज्ञानाबाबत चर्चा केली. अवधुतांकडून गुरुंची लक्षणे ऐकल्यामुळे सायुज्य मुक्ती त्याला मिळाली ती कथा तुला सांगतो. एकदा यदुराजाने आत्मतेजाने प्रकाशमान व ब्रम्हानंदात डुलत येणारा, सर्वत्र निर्भयपणे फिरणारा अवधूत पाहिला. त्यांच्या पूर्णानंदात असलेल्या मूर्तीकडे पाहून राजा अत्यंत प्रभावित झाला. त्याच्या मनात आले कुठे यांचे ब्राह्मतेज आणि इतर ब्राह्मणांची करणी. त्यांची सर्व कर्मे स्वार्थाने लडबडलेली. स्वर्गप्राप्तीचे आमिष दाखवून इतरांना फशी पाडणारे हे लोक होत. हा ब्रह्मवेत्ता ब्राह्मण आहे हे यदुने ओळखले तो निर्भय निःशंकही दिसत होता. त्याच्या शरीरात प्राण आणि अपान यांची समता झाल्याने त्याच्या शरीरातून प्राण बाहेर पडू शकत नव्हते. म्हणजेच त्याचे आयुष्य त्याच्याच हातात होते. त्याच्या शरीराला जरा मरणाचा स्पर्श नव्हता. तो संपूर्णपणे ब्रह्ममय झाला होता. अहं धुतो तो अवधूत! तोच योगी, तोच पवित्र! त्याचे ज्ञान नित्य नूतन असते. अशा अवधुताला पाहून यदुच्या मनात पूज्य भाव निर्माण झाला. त्याला साष्टांग दंडवत घालून तो अतिनम्रतेने म्हणाला, महाराज धर्म, कर्म, आचरण किंवा यमनियम पाळून जे मिळत नाही ते सर्व मला तुमच्यात दिसत आहे. सर्वार्थाने तुम्ही कुशल दिसता. अकर्तेपणाचा बोध झाल्याने निश्चळ दिसता. तुम्ही लहान मुलासारखे वागता आहात पण बालबुद्धी दिसत नाही. तुम्ही सर्वज्ञ आहात असे मला वाटते. या लोकात येऊन नरदेहाची सार्थकता तुमच्याएवढी कुणी केलेली मी पहिली नाही. येथील बहुतेक सर्व लोक धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची इच्छा करणारे असल्याने त्याविषयीचे सर्व ज्ञान ते मिळवतात. करत असलेल्या कर्मकांडाची प्रौढी मिरवतात. स्वर्गभोगाची इच्छा धरतात. मनाला येईल तसे वागतात पण परमार्थासाठी काहीही करत नाहीत. या मूर्खाना लक्ष्मीची भुरळ पडते त्यांच्या नशिबी नसलेल्या लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी उपासना करतात. विषयसुखाच्या आहारी जातात. परमार्थाची चाड इथे कुणालाच नाही. मूर्खाना कशाची भूल पडली आहे काही कळत नाही. खरा स्वार्थ कशात आहे हेच यांना कळत नाही त्याउलट आपण आत्मानंदाने तृप्त होऊन शांत झाला आहात.