ऍशेस मालिकेतील पहिली कसोटी : दुसऱया दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 7 बाद 343, ट्रव्हिस हेड, वॉर्नरची आक्रमक फलंदाजी, ऑलि रॉबिन्सनचे 47 धावात 3 बळी

वृत्तसंस्था /ब्रिस्बेन
शतकवीर ट्रव्हिस हेड (नाबाद 112), अनेक जीवदाने लाभून 94 धावांपर्यंत मजल मारणारा डेव्हिड वॉर्नर व चौफेर फटकेबाजी करण्यात यशस्वी झालेल्या मार्नस लाबुशेन (74) यांच्या जोरकस फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने येथील ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱया दिवसअखेर 7 बाद 343 धावांची मजल मारली आणि 196 धावांची भरभक्कम आघाडी प्राप्त केली.
डेव्हिड वॉर्नरने 3 जीवदानांचा पुरेपूर लाभ घेत इंग्लिश गोलंदाजांवर उत्तम वर्चस्व गाजवले. प्रारंभी, त्याला बेन स्टोक्सच्या नोबॉलवर जीवदान लाभले, त्यावेळी तो 17 धावांवर खेळत होता. नंतर त्याला 48 धावांवर स्लीपमध्ये आणखी एक जीवदान मिळाले आणि 60 धावांच्या आसपास असताना त्याला धावबाद करण्याची संधी इंग्लिश क्षेत्ररक्षकांनी गमावली.
या तीन जीवदानांचा उत्तम लाभ घेत वॉर्नरने मार्नस लाबुशानेसमवेत दुसऱया गडय़ासाठी 74 धावांची तर स्टीव्ह स्मिथसमवेत तिसऱया गडय़ासाठी 23 धावांची भागीदारी साकारली. अखेर चहापानानंतरच्या सत्रात ऑलि रॉबिन्सनने त्याला कव्हर्समधील स्टोक्सकरवी झेलबाद करत महत्त्वाचा अडसर दूर केला. वॉर्नर बाद झाल्यानंतर पुढील चेंडूवरच कॅमेरुन ग्रीन देखील त्रिफळाचीत झाला. ग्रीनने चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात तो यष्टीवर ओढवून घेतला. नवा यष्टीरक्षक-फलंदाज ऍलेक्स कॅरेने हॅट्ट्रिक रोखली. पण, नंतर तो 12 धावांवर बाद झाला. यादरम्यान ऑस्ट्रेलियाची 2 बाद 189 वरुन 5 बाद 195 अशी पडझड झाली.
नाबाद शतकवीर ट्रॅव्हिस हेड व कर्णधार पॅट कमिन्स यांनी 70 धावांची भागीदारी साकारत ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व अबाधित राखले. नंतर इंग्लिश कर्णधार जो रुटने कमिन्सला लेग स्लिपकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. ट्रव्हिस हेड 96 धावांवर असताना स्वीप करण्याच्या प्रयत्नात झेलबाद होता होता वाचला. नंतर हेडने 85 चेंडूत शतक साजरे केले. नव्या चेंडूवर ख्रिस वोक्सला चौकार फटकावत त्याने तिहेरी धावसंख्या गाठली. त्याच्या खेळीत 12 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. दिवसअखेर तो 112 धावांवर नाबाद राहिला.
इंग्लिश संघातर्फे रॉबिन्सनने 18 षटकात 48 धावात 3 बळी घेत सर्वात भेदक मारा साकारला. डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचने लाबुशानेचा महत्त्वाचा बळी टिपला. मात्र, इतका अपवाद वगळता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी त्याचा उत्तम समाचार घेतला. त्याचे पृथक्करण 11 षटकात 95 धावात 1 बळी असे राहिले. स्टोक्सची गोलंदाजी 9 षटकात थांबवण्यात आली. जुन्या चेंडूवर गोलंदाजी करताना त्याला सातत्याने झगडावे लागले.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव : सर्वबाद 147.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : डेव्हिड वॉर्नर झे. स्टोक्स, गो. रॉबिन्सन 94 (176 चेंडूत 11 चौकार, 2 षटकार), मार्कस हॅरिस झे. मलान, गो. रॉबिन्सन 3 (17 चेंडू), मार्नस लाबुशाने झे. वूड, गो. लीच 74 (117 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), स्टीव्हन स्मिथ झे. बटलर, गो. वूड 12 (19 चेंडूत 2 चौकार), ट्रव्हिस हेड खेळत आहे 112 (95 चेंडूत 12 चौकार, 2 षटकार), कॅमेरुन ग्रीन त्रि. गो. रॉबिन्सन 0 (1 चेंडू), ऍलेक्स कॅरे झे. पोप, गो. वोक्स 12 (32 चेंडूत 1 चौकार), पॅट कमिन्स झे. हमीद, गो. रुट 12 (27 चेंडू), मिशेल स्टार्क खेळत आहे 10 (24 चेंडूत 1 चौकार). अवांतर 14. एकूण 84 षटकात 7 बाद 343.
गडी बाद होण्याचा क्रम
1-10 (हॅरिस, 5.2), 2-166 (लाबुशाने, 47.2), 3-189 (स्मिथ, 52.6), 4-195 (वॉर्नर, 55.2), 5-195 (ग्रीन, 55.3), 6-236 (कॅरे, 64.4), 7-306 (कमिन्स, 75.6)
गोलंदाजी
ख्रिस वोक्स 20-7-56-1, ऑलि रॉबिन्सन 18-8-48-3, मार्क वूड 20-4-57-1, बेन स्टोक्स 9-0-50-0, जॅक लीच 11-0-95-1, जो रुट 6-0-29-1.

स्टोक्सने तब्बल 14 वेळा ओव्हरस्टेपिंग करुनही केवळ दोनच नोबॉल!
बुधवारी दुसऱया दिवसातील पहिल्या सत्रात स्टोक्सच्या गोलंदाजीवर वॉर्नरला टीव्ही पंचांकडून जीवदान मिळाले. पण, यात तो ओव्हरस्टेपिंग करत असल्याचे रिप्लेत स्पष्ट झाले. आश्चर्य म्हणजे त्यापूर्वीच्या सलग 3 चेंडूवर देखील त्याने ओव्हरस्टेपिंग केले होते. या पहिल्या सत्रात स्टोक्सने चक्क 14 वेळा ओव्हरस्टेपिंग केले. मात्र, मैदानी पंचांनी यापैकी फक्त दोनच वेळा नोबॉल दिला होता, असे टीव्ही ब्रॉडकास्टर चॅनेल 7 ने निदर्शनास आणले.
अन् म्हणूनच टीव्ही पंचांना ते नोबॉल दिसून आले नाहीत!
बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर वॉर्नर बाद झाला, तो चेंडू नोबॉल दिला गेल्याने स्टोक्स व इंग्लंडसाठी ही प्रतिकूल बाब ठरली. या निर्णयामुळे, वॉर्नरला जीवदान मिळाले, एक धाव खात्यात जमा झाली आणि एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागला. मात्र, सामनाधिकाऱयांसाठी यापेक्षा मोठी समस्या होती. गब्बावर टेक्नॉलॉजी प्रॉब्लेममुळे तिसरे पंच पॉल विल्सन यांना प्रत्येक चेंडूचा टीव्ही रिप्ले पाहता येत नसून यामुळे गोलंदाजाने ओव्हरस्टेपिंग केले आहे का, यासाठी मैदानी पंचांवरच अवलंबून रहावे लागले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने समालोचन करताना अतिशय खराब कामगिरी, अशा तिखट शब्दात पंचगिरीचा समाचार घेतला.









