लंडन : गुरुवारी येथील वेम्बले स्टेडियमवर झालेल्या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. 1985 नंतर म्हणजेच तब्बल 35 वर्षांनी इंग्लंडचा आयर्लंडवरील हा पहिला विजय आहे.
या सामन्यात इंग्लंडने 18 व्या मिनिटाला आपले खाते उघडले. कर्णधार मॅग्युरेने हेडरद्वारे हा गोल केला. सामन्याच्या पूर्वार्धात इंग्लंड संघाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. इंग्लंडचा दुसरा गोल पेनल्टीवर क्लेव्हर्ट लेविन्सने केला. हा सामना प्रेक्षकांविना खेळविला गेला. या सामन्यातील विजयामुळे नेशन्स लिग स्पर्धेतील आगामी होणाऱया बेल्जियम आणि आईसलँड यांच्या विरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंड संघाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे.
नेशन्स लिग फुटबॉल स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या सामन्यात डेन्मार्कने इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला होता. इंग्लंड आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये यापूर्वी झालेले सहा सामने बरोबरीत राहिले होते. प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे डब्लीनमधील 1995 साली झालेला सामना वाया गेला होता. गुरुवारच्या सामन्यात इंग्लंडचा तिसरा गोल हॅरी विंग्जने नोंदवित आयर्लंडचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.









