तातडीने कचऱयाची उचल करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या यंदे खूट रोडवर गेल्या कित्येक दिवसांपासून कचरा पडून आहे. अनेकवेळा निदर्शनास आणून देऊन देखील याकडे मनपा स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष झाल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरली आहे. एकीकडे शहराची स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू तर दुसरीकडे शहरातील कचरा समस्या मनपासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
यंदे खूट रोडवर गेल्या कित्येक दिवसांपासून कचऱयाचा ढीग पडून आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याने कचऱयात वाढ होत असून कचरा रस्त्यावर विखुरला गेला आहे. परिणामी भटकी जनावरे अन्नाच्या शोधार्थ कचऱयावर फिरताना दिसत आहेत. स्वच्छता विभागाने तातडीने कचऱयाची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
सतत गजबजणाऱया या मार्गावर फेरीवाल्यांसह प्रवासी, रिक्षाचालकांची ये-जा असते. शिवाय प्रवाशांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. मात्र रस्त्यावरच कचरा पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील कचऱयाचे व्यवस्थापन मनपाकडून व्यवस्थित होत नसल्याने सर्वसामान्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मुख्य सिग्नलजवळही कचरा साचून असल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा होत आहे. या परिसरातील कचऱयाची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









