कित्येक दिवसांपासून कचऱयाचा ढीग : तातडीने कचऱयाची उचल करून स्वच्छता करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या यंदे खूट रोडवर कचऱयाची उचल न झाल्याने अस्वच्छता पसरली आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून विकासकामे सुरू आहेत. दुसरीकडे शहरातील कचरा समस्या मनपासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. यंदेखूट रोडवर गेल्या कित्येक दिवसांपासून कचऱयाचा ढीग पडून आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष झाल्याने कचऱयात वाढ होत आहे. परिणामी परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्वच्छता विभागाने तातडीने कचऱयाची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
सतत गजबजणाऱया यंदे खूट रस्त्यावर फेरीवाल्यांसह प्रवासी, रिक्षाचालकांची ये-जा असते. पश्चिम भागातील प्रवाशांचीही मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरच टाकण्यात आलेल्या कचऱयामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे. हा कचरा भटकी कुत्री व जनावरांमुळे सर्वत्र विखुरला जात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर पडून असलेल्या कचऱयाचे व्यवस्थापन मनपाकडून व्यवस्थित होत नसल्याने शहरात कचरा समस्या गंभीर बनत आहे.
शहरात प्रवेश करणारी अनेक वाहनांची व पादचाऱयांची या रस्त्यावरून ये-जा सुरू असते. मात्र, या रस्त्यावर दोन ठिकाणी कचरा साचून आहे. मुख्य सिग्नलजवळही कचरा साचून असल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा येत आहे. परिसरातील कचऱयाची उचल करून स्वच्छता राखावी, अशी मागणी जोर धरत आहे.









