प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटात नूतन शैक्षणिक वर्षारंभाचा दिवस हुकला आहे. नूतन शैक्षणिक वर्षारंभ म्हणजे उत्साह, नवीन पुस्तके, नवीन शिक्षक, नवीन मित्र, अभ्यासापासून अध्ययनापर्यंतचे सर्व नावीन्यच असते. मात्र कोविड 19 मध्ये शाळेचे लॉकडाऊन कायम राखत 29 मे पासून सुरू होणारे नूतन शैक्षणिक वर्ष लॉक करण्यात आले आहे. यामुळे शैक्षणिक वर्षाशी संबंधित असणारी रिक्षाची वर्दी, पालकांची लगबग, विद्यार्थ्यांची किलबिल, शिक्षकांचा आवाज कोरोना संकटात विरून गेला. मात्र या दिवसाबरोबरच शाळा केव्हा सुरू होणार? शिक्षणमंत्री कोणता निर्णय घेणार? प्रवेश प्रक्रियेला परवानगी दिली जाणार का? दोन सत्रात शाळा भरविण्यात येतील का? शाळेत सामाजिक अंतर राखले जाईल का? अभ्यासक्रम कमी केला जाईल का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
सालाबादप्रमाणे शाळांच्या शैक्षणिक वर्षाला दि. 29 मे पासून प्रारंभ होतो. शाळेचा प्रारंभोत्सव, सेतुबंद कार्यक्रम, विद्यार्थी-शिक्षक परिचय, पालकांशी संवाद, विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत, पाठय़पुस्तक वितरण करून शाळेचा पहिला दिवस प्रत्येक शाळेत दिमाखात साजरा केला जातो. मात्र कोरोनाच्या संकटात शाळा प्रारंभोत्सवाचा आनंद हरवून गेला आहे. ना प्रार्थनेचे सूर, ना मैदानात विद्यार्थ्यांची दंगा-मस्ती, ना वर्गखोलीत अध्यापनाचे तंत्र, ना मध्यान्ह आहार घेण्यासाठी रांगा, ना सुटीतील गंमती-जमतीच्या गप्पा. शाळेत केवळ निरव शांतता आणि शुकशुकाटच अनुभवायला मिळाला. शाळा व्यवस्थापनाने स्वच्छता करणे, तसेच कागदपत्रे सुव्यवस्थित राखणे, शिक्षकांशी संवाद साधत ऑनलाईन अभ्यासाबाबत चर्चा करणे ही व्यवस्थापकीय कामगिरी पार पाडली. मात्र शाळेचा पहिला दिवस प्रथमच विद्यार्थ्यांविना गेल्याचे चित्र यामुळे पहायला मिळाले.
कोविड-19 चा धोका ओळखत साधारण 16 मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या. शाळांना सुटी पडून साधारण अडीच महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. यामुळे शैक्षणिक प्रणालीशी संबंधित सर्वच घटकांना सुटी मिळाली. संकट दूर होईल आणि शाळा वेळेत सुरू होतील, असा विश्वास वाटत होता. मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेऊन सध्याच्या परिस्थितीत शाळा सुरू करण्याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे शाळा नेमक्या जुलै, ऑगस्ट की सप्टेंबरमध्ये सुरू होणार याबाबत अनभिज्ञता आहे. मात्र शैक्षणिक प्रणालीशी संबंधित घटकांकडून कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ देत व परिस्थिती पूर्वपदावर येऊ देत, अशी आशा व्यक्त होत आहे.
शाळेच्या शैक्षणिक प्रवाहातील मुख्य घटक असणाऱया शिक्षकांकडून शाळेचा पहिला दिवस हुकल्याची खंत असली तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयासोबत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
संकट दूर झाल्यानंतर शाळा सुरू होतील
-मुख्याध्यापक व्ही. हसबे (सेंट्रल हायस्कूल)
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांविना गेला आहे. दरवर्षी प्रार्थनेच्यावेळी प्रारंभोत्सव साजरा केला जातो. मात्र या संकटात हे सर्व विरून गेले आहे. महामारीच्या संकटात विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांवर असून संकट दूर झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयानुसार शाळा सुरू होतील व त्यावेळी शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा होईल. विद्यार्थ्यांनी हसत रहा, आनंदी रहा, असे आवाहन व्ही. हसबे यांनी केले.
आधुनिकप्रणालीचा अवलंब
-प्राचार्य एस. एस. पाटील (मराठा मंडळ, पी. यु. कॉलेज)
कोरोनाच्या संकटात महाविद्यालयीन वेळापत्रकही बदलून गेले आहे. महाविद्यालयाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांशिवाय गेला असला तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व्हॉट्सऍपच्या माध्यमातून अध्यापन केले जात आहे. विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा व शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आधुनिकप्रणाली अवलंबली जात असल्याचे मत व्यक्त केले.
आता सुटीचा कंटाळा आला आहे
-वैष्णवी नाईक (विद्यार्थिनी)
शाळेच्या पहिल्या दिवशी खूप मज्जा असते. सुटीतील गंमती-जमती सांगणे, चॉकलेट-खाऊचा आस्वाद घेणे, फुलाने होणारे स्वागत तर खूप आनंद देऊन जातो. मात्र यंदा हा दिवस हुकला आहे. आता सुटीचा कंटाळा आला आहे. त्यामुळे लवकर शाळा सुरू व्हावी, असे मत वैष्णवी नाईक हिने व्यक्त केले.
संकट लवकर दूर व्हावे
-भूमिका किल्लेकर (विद्यार्थिनी)
कोरोना महामारीमुळे अचानक सुटी मिळाली, पण आता ही सुटी नको वाटतेय. शाळेच्या पहिल्या दिवशी पहिल्या बेंचवर बसणे आणि शिक्षकांकडून स्वागत करून घेणे, याची मजा खूप होती. मात्र शाळा सुरू नसल्याने आता वाट पहावी लागणार आहे. हे संकट लवकर दूर व्हावे, परिस्थिती लवकर सुधारावी, असे मत भूमिका किल्लेकर हिने व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय व्हावा
नीता दळवी (पालक)
कोविड-19 चे संकट शैक्षणिक क्षेत्रावरदेखील खूप मोठा परिणाम करणारे ठरले आहे. अडीच महिन्यापासून मुलांना सुटी देण्यात आली असून मुले कंटाळली आहेत. त्यातच शाळेचा पहिला दिवसदेखील हुकला असून शाळा सुरू करण्याबाबत कोणतेच संकेत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांना शिस्त व चांगल्या सवयी शाळेतच लागतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय व्हावा, असे मत नीता दळवी यांनी व्यक्त केले.
शाळा लॉक झाल्याने रिक्षाची वर्दीदेखील लॉक
-बाळू नाईक (वर्दी रिक्षाचालक)
दरवर्षे 29 मे पासून वर्दीच्या रिक्षाला प्रारंभ होतो. रिक्षाच्या हॉर्नच्या आवाजावरूनच शाळा प्रारंभोत्सवाची चाहुल लागते. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना चॉकलेट किंवा आईस्क्रीम देऊन सुरुवात केली जाते. मात्र लॉकडाऊनमध्ये शाळा लॉक झाल्याने रिक्षाची वर्दीदेखील लॉक झाली आहे. ऑगस्ट महिन्यात शाळा सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र तोपर्यंत उदरनिर्वाह चालविणे, रिक्षाचे हप्ते भरणे कठीण आहे. यामुळे शाळा, विद्यार्थी यावर सुरू असणारा वर्दी व्यवसाय अडचणीत असल्याचे मत बाळू नाईक यांनी व्यक्त केले.









