मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची माहिती
बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे राज्य सरकारची आर्थिक स्थिती कोलडमली असल्याने राज्य सरकारने मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांना सायकल, बुट, सॉक्सचे वितरण केले नव्हते. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी यंदा शालेय विद्यार्थ्यांना, बुट, सॉक्स आणि सायकलींचे वितरण करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
यंदा थोडा विलंब झाला असला तरी सरकारी, अनुदानित शाळांमधील आठवीच्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात येईल. तसेच पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बुट, सॉक्स वितरीत केले जाणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री बी. सी. नागेश अधिकाऱयांशी चर्चा करत आहेत, अशी माहिती बोम्माई यांनी म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
2019-20 या शैक्षणिक वर्षापासून सरकारी माध्यमिक शाळांमधील आठवीच्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करणे थांबविण्यात आले आहे. मागील दोन शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना बुट, सॉक्सही वितरीत करण्यात आलेले नाहीत. 2022-23 या वर्षातील अर्थसंकल्पात याकरिता अनुदानाची तरतुदही करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा सरकारी शालेय विद्यार्थ्यांना सायकल, बुट, सॉक्सचे वितरण होणार नाही, असे सांगण्यात आले होते. याला तीव्र विरोध व्यक्त झाला असून काँग्रेस नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यंदापासूनच बूट सॉक्स आणि सायकलींचे वितरण करण्यात येईल, असे सांगितले आहे.
आगामी दिवसात निर्णय घेणार ः बी. सी. नागेश
गुलबर्गा येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकारने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. बुट, सॉक्स, सायकलींचे वितरण करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कोरोनामुळे आदी दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. वर्गखोल्यांची निर्मिती व इतर पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आलेला आहे. आगामी दिवसात सॉक्स, बुट, सायकलींच्या वितरणाविषयी निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.









