लागवडक्षेत्र 18 टक्क्यांनी वाढले : ग्रामीण भागाने विकासाप्रकरणी शहरीक्षेत्राला पिछाडले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जुलैच्या तिसऱया आठवडय़ात अनुकुल पर्जन्यमानामुळे देशाच्या प्रमुख खरीप पिकांचे लागवडक्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत 18.50 टक्क्यांनी वाढले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. प्रमुख खरीप पिकांमध्ये धान्य, डाळी, कडधान्य आणि तेलबियांच्या लागवडीची 24 जुलैपर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 24 जुलैपर्यंत पेरणीचे क्षेत्र 799.95 लाख हेक्टर राहिले आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीत हा आकडा 675.07 लाख हेक्टर इतका होता.
ग्रामीण विकासाने शहरी विकासाच्या वेगाला मागे टाकले आहे. चांगली पेरणी आणि अधिक उत्पादनामुळे ग्रामीण उत्पन्नात मोठी भर पडू शकते. 24 जुलैपर्यंत धान्याची पेरणी 220.24 लाख हेक्टरमध्ये करण्यात आली आहे.
मागील वर्षी याच कालावधीत धान्याची पेरणी केवळ 187.70 लाख हेक्टरमध्ये करण्यात आली होती. उत्तरप्रदेश (6.50 लाख हेक्टर), झारखंड (6.10 लाख हेक्टर), मध्यप्रदेश (5.98 लाख हेक्टर), बिहार (5.66 लाख हेक्टर), छत्तीसगड (3.57 लाख हेक्टर) आणि पश्चिम बंगाल (2.80 लाख हेक्टर) या राज्यांमध्ये पेरणीचे क्षेत्र वाढले आहे.
डाळींचे लागवडक्षेत्र वाढले
डाळींकरता 99.71 लाख हेक्टरमध्ये आतापर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर ज्वारी, बाजरी, नाचणी आणि मक्का यासारख्या पिकांच्या क्षेत्रात 16.83 लाख हेक्टरची वृद्धी झाली आहे.









