प्रतिनिधी / बेळगाव
दसरोत्सव तोंडावर येवून ठेपला आहे. गणेशोत्सवापाठोपाठ बेळगावात दसराही मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. गल्लोगल्ली गरबा रासदांडीया कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. मात्र यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरात दांडीयावर बंदी घालण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. इतर कार्यक्रमांवरही निर्बंध असणार आहेत.
बेळगावसह कर्नाटकात कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. रोज रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात सरकारने नियमावली तयार केली आहेत. यासंबंधी नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. यंदा दांडीयाला परवानगी देणार नाही, अशी माहिती वरि÷ अधिकाऱयांनी दिली.
मूर्ती प्रतिष्ठापनेसाठीही जाचक नियम
अनेक ठिकाणी नवरात्रोत्सवात मंडप उभारुन दुर्गादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा मूर्ती प्रतिष्ठापनेसाठीही जाचक नियम असणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होईल, कोरोना महामारीचा फैलाव वाढेल अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली आहे.
तरुण भारतने गुरुवारी सायंकाळी पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधला असता राज्य सरकारने ठरवून दिलेल्या कोविड-19 नियमावलीनुसार कोणत्या कार्यक्रमांना परवानगी द्यायची व कोणत्या कार्यक्रमांना नाही, याचा निर्णय होणार आहे. परवानगी दिली तरी त्यासाठी नियम व अटी असणार आहेत. लवकरच या संबंधीचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नवरात्रीत बेळगाव शहर व तालुक्मयात दुर्गामाता दौड काढण्यात येते. यासंबंधी अद्याप आयोजकांनी पोलीस दलाशी चर्चा केली नाही. कोणत्याही परिस्थितीत गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, ही प्रशासनाची भूमिका असणार आहे. मूर्ती प्रति÷ापनेसह अन्य कार्यक्रमांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातही दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यंदा गरबा, रास दांडीयासह सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर मनाई असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. बेळगावातही प्रशासकीय अधिकाऱयांची या संबंधी चर्चा सुरू असून लवकरच अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
श्री रेणुका यल्लम्मा देवी

नवरात्रोत्सवात यल्लम्मा, मायक्का देवीचे दर्शन नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवात महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवी व चिंचली (ता. रायबाग) येथील श्री मायक्का देवींची मंदिरे बंद असणार आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत ही मंदिरे बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी काढला आहे. सौंदत्ती यल्लम्मा मंदिराचे प्रशासकीय अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून श्री यल्लम्मा देवी, चिंचली मायक्का देवी व जोगुळभावी सत्यम्मा देवीची मंदिरे बंद आहेत. या तिन्ही प्रमुख मंदिरातील दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. 18 मार्चपासून या मंदिरात देवदर्शन बंद आहे. नवरात्रोत्सवात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी विविध राज्यांतून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र कोरोनाचा फैलाव वाढत चालल्याने भाविकांच्या आरोग्याचा विचार करुन 31 ऑक्टोबरपर्यंत देवदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या काळात या प्रमुख मंदिरातील धार्मिक विधी व्यवस्थितपणे चालणार आहेत.









