ला नीनाचा परिणाम, बंगालच्या उपसागरात वादळेही अधिक होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदा भारतात थंडी अधिक तीव्र पडणार असून ती अधिक काळ टिकणारही आहे, असे अनुमान हवामान विभागाने वर्तविले आहे. प्रशांत महासागरातल्या ला नीना या सागरी प्रवाहामुळे हा परिणाम संभवत आहे. ला नीनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सध्या तिच्या परमोच्च बिंदूवर असून ती मार्चपर्यंत राहणार आहे.
ला नीनामुळे हिंवाळय़ातील तापमान नेहमीपेक्षा कमी असेल. नेहमीच्या हिंवाळय़ातील तापमानापेक्षा ते 3 ते 6 डिग्री सेल्शियसने कमी असू शकते. काही दिवसांमध्ये तर ते त्याहीपेक्षा खाली जाऊ शकेल असे तज्ञांनी स्पष्ट केले. 2019 मध्ये अशी परिस्थिती आली होती. तथापि, यंदा त्याहीपेक्षा जास्त थंडी जाणवू शकते. तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये बंगालच्या उपसागरात चक्री वादळे अधिक होणार आहेत. ला नीनाचा परिणाम केवळ भारतावर नव्हे, तर सर्व जगावर वेगवेगळय़ा प्रकारे जाणवतो. कॅनडा, रशिया आणि युरोपात नेहमीपेक्षा यंदा अधिक प्रमाणात हिमवादळे येणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
प्रशांत महासागराचे तापमान कमी
प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान यावेळी नेहमीपेक्षा अर्धा डिग्री सेल्शियसने कमी आहे. त्यामुळे ला नीना परिस्थिती प्रभावी झाली आहे. ला नीना हा सागरी प्रवाह पृष्ठभागावर आला की महासागराचे तापमान काहीसे कमी होते. त्याचा परिणाम थंडी वाढण्यात होतो आणि त्याचे पडसाद भारतातही उमटतात. ला नीना परिणामामुळे मान्सूनचा पाऊसही अधिक प्रमाणात पडतो.









