संसर्ग वाढू नये यासाठी कलाकारांचे एकमत : पुढच्या वर्षी लवकर येऊ!
प्रतिनिधी / फोंडा
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून कालच्या दिवशी रूग्णसंख्येने पाचशेचा आकडा गाठला आहे. कोरोनाच्या सावटात गणेश चतुर्थीवरही विरजण पडलेले आहे. चतुर्थीनिमित्त बांधण्यात येत असलेली पारंपारिक माटोळीही यंदा कमी प्रमाणात बांधण्यात येणार आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक माटोळी पाहण्याच्या निमित्ताने संसर्ग वाढू नये यासाठी पारंपारिक कलात्मक माटोळी साकारणाऱया फोंडा अंत्रुज महालातील माटोळी कलाकारांनीही संयुक्तरित्या विविधांगी माटोळी दर्शन देखावे साकारणार नसल्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्य़ामुळे यंदा कलात्मक माटोळी व गणपती देखाव्याचे दर्शन दुर्लभ होणार आहे.
माशेल भागातील 21 दिवस उत्सव साजरे करणारे बहुतेक गणपती देखावे कलाकारांनी यंदा गणेश चतुर्थी अत्यंत साध्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माशेल येथील देवकिकृष्ण मैदानासमोर कलात्मक देखाव्यासह साजरी होणारी चतुर्थी उत्सव दीड दिवसापुरता मर्यादीत स्वरूपात साजरा होणार असून देखावे यंदा करण्यात येणार नाही. माटोळी कलाकार व कलात्मक गणपती बनविणारे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर साहित्य गोळा करण्यात व्यस्त असायचे यंदा कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वांनी स्वस्त रहा, घरीच रहा असा संदेश दिलेला आहे.
गणेश चतुर्थीवर विरजण, लोकांना चाहूल गणेश जयंतीची
राज्यातील सर्वात मोठा सण गणेश चतुर्थी असून त्य़ानिमित्ताने घरोघरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी नवीन मखरे, कलात्मक माटोळी, रंगीबिरंगी पताका व रोषणाई असा माहोल प्रत्येक घरात हमखास असतो, यंदा मात्र यावर खंड पडणार असून बहुतेकांनी अशी महामारीचा अनुभव पहिल्यांदाच घेतलेला आहे. यावेळी मुर्तीचा आकारही लहान बनविण्याचा आग्रह असून मुर्तीकारांनाही रंग इतर साहित्य मिळविण्यासाठी त्रास असल्यामुळे शक्यतो मुर्तीचा आकार लहानच ठेवण्यात आलेला आहे. काही भक्तांनी गणेश चतुर्थी अत्यंत साध्या प्रमाणात साजरी करून फेब्रु. महिन्यात येणारी गणेश जयंती उत्सव मोठय़ा उमेदीने साजरा करावा असे आवाहन केलेले आहे.
सरकारतर्फे कला व संस्कृती खात्यातर्फे कलात्मक माटोळी स्पर्धा घेण्यात येत होती, यंदा कोरोना महामारीमुळेही तिही रद्द केल्यात जमा आहे. नवीन ट्रेन्ड असलेली गाजलेली व्यक्तीरेखेनुरूप श्री गणेशाची प्रतिमा, कलात्मक माटोळीद्वारे श्रींचे रूप साकारण्यात हातखंडा असलेल्या बहुतेक कलाकारांनी हा निर्णय घेतला आहे. तरीही काही मोजक्याच कलाकारांचा उत्साह कायम असून कोरोनाच्या भीतीमुळे घरात अडकून पडलेल्या युवकांनी माटोळी साहित्य एकत्रित केलेले आहेत. फक्त जंगल भटकंती करून मिळवत असलेल्या साहित्याला फाटा देण्यात आलेला आहे.
यंदा फोंडा तालुक्यातील बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी उत्सव दीड दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने जाहीर केलेल्या एसओपीनुसार मंडप फक्त गणेश पुजनापुरता मर्यादीत करण्याचे आदेश दिला आहे. तरीही काही मंडळानी मंडप न उभारता संस्थेच्या कार्यालयात श्रीचे पूजन करण्याचे निर्णय घेतला आहे.
रंगनाथ गावकर, बेतोडा माटोळी कलाकार
निसर्ग संवर्धनाचा संदेश देत विविधांगी कलात्मक माटोळी साकारणारे गोठावाडा बेतोडा येथील रंगनाथ गावकर व कुटूंबियांनी मागील बारा वर्षापासून पारंपारिक माटोळीचे जतन करतात. यावर नाविन्याचा साज चढविताना 474 वस्तूचा समावेश असलेली गरूडभरारी, अमृतकलश माटोळी यापुर्वी साकारलेली होती. सन 2009 सालापासून ते विविध प्रकारच्या कलात्मक माटोळी साकारत आहेत. यंदा माटोळी दर्शनामुळे गणेशभक्तांना कारोनाचा संसर्ग वाढू नये, बहुतेक माटोळी कलाकारांना हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पुढच्या वर्षी भव्य दिव्य देखावा करू
गणपती देखावा कलाकार संजय नावेलकर, माशेल
माशेल येथील नावेलकर बंधुनी मागील 44 वर्षाच्या कार्यकाळात आपल्या गणपती देखाव्याच्या साधनेत कधीच खंड पडल्याचे ऐकिवात नसल्याची माहिती दिली. 1976 सालापासून चलचित्र, गणपती मुर्ती त्यानंतर एकवीस दिवशीय गणपती देखावा असा गणेश चतुर्थी उत्सवाचा कार्यक्रम असायचा. यंदा कोरोनाची जागतीक महामारीचा धोका लक्षात घेता उत्सव मर्यादीत स्वरूपात साजरा करणार असल्याचे सांगितले. तसेच सामाजिक अंतर राखा, स्वस्त रहा असा संदेश गणेशभक्तांना दिला आहे. आमच्या कलेची कदरदान करणारे लोक सुखरूप रहावे. पुढील वर्षी मोठय़ा उमेदीने अथक मेहनत घेत कलेच्या माध्यमातून भाविकांना आश्चर्याचा धक्का देणारे देखावा सादर करू, जेणेकरून मागील वर्षी कोरोनामुळे खंड पडलेला काळही लोकांच्या विस्मरणात जाईल.
राया बोरकर –अध्यक्ष, सदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
फोंडय़ातील सर्वात जुने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून तसेच फोंडय़ाचा राजा म्हणून ख्याती असलेले सदर गणेशोत्सव मंडळाचे अध्य़क्ष राया बोरकर यांच्या मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा उत्सव मर्यादीत स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीचे पूजन क्रांती मैदानाऐवजी संस्थेच्या तिस्क-फोंडा येथील सभागृहात फक्त दीड दिवसाचे पूजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या सावटात सर्वानी आपल्यासह इतरांच्या आरोग्याचा काळजीपोटी दक्षता बाळगणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणतात.
गणेशमुर्ती कलाकार विष्णू नाईक, आडपई
फोंडा तालुक्यात साधारण पंचावन्न ते साठ चित्रशाळा आहेत. त्यामध्ये आजही गोमंतकीय परंपरेनुसार चिकण मातीच्या गणेशमूर्ती तयार होतात. पोकळेवाडा-आडपई येथील ज्येष्ठ मूर्तीकार विष्णू रघुवीर नाईक यांच्या घरातील चित्रशाळेत शंभरहून अधिक मूर्ती घडवून तयार झालेल्या आहेत. विविध वाहनांवरील आकर्षक व तेवढेच कलात्मक गणपती बनविणे ही त्यांची खासियत आहे. मूर्तींसाठी लागणारे साचे ते स्वतःच तयार करतात. मात्र यंदा कोरानाच्या सावटात उत्साही वातावरणात विरजण पडलेले आहे. बहुतेकांच्या घरी फक्त दीड दिवस पूजन होणार असल्याने मुर्तीचा आकार लहान असावा आग्रह गणेशभक्त करत आहेत. येत्या 22 ऑगस्ट रोजी येणाऱया श्री गणेशाच्या आगमनाने कोरोना महामारीचा चढता आलेख घसरून सर्वाना येणारा काळ सुखावह ठरो हेच श्रीचरणी मागणे.