ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसने दशमीला पंढरपुरात पोहोचणार, पुण्यातील बैठकीत निर्णय
पुणे / प्रतिनिधी
महाराष्ट्राचा आद्यात्मिक व सांस्कृतिक ठेवा असलेली आणि लाखो वारकऱयांच्या साक्षीने पंढरपूरकडे नित्यनेमाने निघणारी आषाढीची पायी वारी यंदा खंडित होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी पायी वारी न काढण्याचा निर्णय पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. दरम्यान, यंदा संतांच्या पादुका या हेलिकॉप्टर अथवा एसटी बसने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरात दाखल असून, यासंदर्भातील अंतिम निर्णय परिस्थिती पाहून घेण्यात येणार असल्याचेही या वेळी निश्चित करण्यात आले.
यंदाच्या आषाढी सोहळय़ासाठी संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांसह अन्य संतांचा पालखी सोहळा परंपरेप्रमाणे मार्गस्थ होणार की नाही, याबाबत पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील तसेच आळंदी आणि तसेच सर्व प्रमुख संस्थानचे पदाधिकारी आणि पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त उपस्थित आहेत. यंदा कुठल्याही प्रकारच्या दिंडय़ा निघणार नाहीत, असे बैठकीत निश्चित करण्यात आले.
यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे. वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वारीची ही परंपरा अखंडित ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थानच्या पादुकांना राज्य शासनाच्या वतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेताना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल.
घरातूनच पांडुरंगाचे दर्शन घ्या : अजित पवार यांचे आवाहन
आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, या संतांनी दिलेल्या शिकवणीचा आदर करुया. आषाढी वारीसाठी आपण सर्वांनी शासनाकडे सकारात्मक भूमिका मांडली व शासनाच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत केले, ही कौतुकास्पद बाब आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व धर्मीयांनी आपले धर्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत. हाच आदर्श समोर ठेवून या वषीचा आषाढी वारीचा कार्यक्रम व परंपरा गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करून पार पाडायची आहे. या सोहळय़ासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याबाबतची सर्व ती खबरदारी राज्यशासन घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले. वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्व संस्थानांची सहमती
यंदा या निर्णयास सर्व वारकरी संप्रदाय आणि देहू आळंदीच्या विश्वस्तांनीदेखील सहमती दर्शवली. या वर्षी जास्तीत जास्त 10 वारकऱयांसह पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारी सोहळय़ासाठी राज्यातील आणि राज्याबाहेरील वारकऱयांना येता येणार नाही.
परंपरा व अन्य बाबींची सांगड घालणार
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आळंदी देवस्थानचे प्रमुख ऍड. विकास ढगे म्हणाले, ज्या मानाच्या सात पालख्या आहेत, त्या पालख्यांमधील संताच्या ज्या पादुका आहेत, त्या देव भेटीसाठी पंढरपुरात निश्चित जाणार आहेत. दशमीला त्या पादुका पंढरपुरमध्ये जातील. मात्र, त्या कशाप्रकारे जातील, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यंदा पायी वारी होणार नाही, यावर सर्वांचे एकमत झाले आहे. +फक्त पादुका जात असताना त्या बस, विमान किंवा हेलिकॉप्टर असे तीन पर्याय शासानाने ठेवलेले आहेत. त्या वेळची पावसाळी परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस खात्याचे संबंधित अधिकारी व संस्थान कमिटीचे विश्वस्त हे निर्णय घेतील. पादुका कशाप्रकारे न्यायच्या याबाबतचा अंतिम निर्णय साधारण दशमीच्या अगोदर केला जाईल. तसेच पादुका नेत असताना संस्थान पंरपरा व अन्य बाबींची सांगड घालणार आहे. परंतु व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी सरकारची असणार आहे. याबाबत शासनानेदेखील अनुकुलता दर्शवली असल्याचे त्यांनी नमूद केले.
वारकरी निर्णयाचे स्वागत करतील : मधुकर मोरे
राज्यशासनाने जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाचे वारकरी निश्चितपणे स्वागत करतील, असे देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले.
शासन नियमांचे पालन आवश्यक : विभागीय आयुक्त
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर प्रास्ताविक करताना म्हणाले, आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत आपण 15 मे रोजी बैठक घेतली. मात्र पंधरा दिवसात पालखी मार्गक्रमण करीत असलेल्या पुणे, सातारा, सोलापूर, या तीनही जिल्हय़ात रुग्ण संख्या वाढली आहे. पुढील कालावधीत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्मयता आहे. पंढरपूर येथेही रुग्ण आढळले आहेत. एकूणच पुणे विभागात सांगली जिल्हय़ाचा अपवाद वगळता चारही जिल्हय़ात रुग्ण संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत शासनानाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसने दशमीला पंढरपुरात पोहोचणार, पुण्यातील बैठकीत निर्णय








