आयोजकांची महत्त्वपूर्ण घोषणा, शनिवारी विद्यमान विजेते चेन्नई-कोलकाता यांच्यात रंगणार सलामी लढत,
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शनिवारपासून खेळवल्या जाणाऱया यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यांसाठी प्रेक्षक क्षमतेच्या फक्त 25 टक्के चाहत्यांना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा आयोजकांनी बुधवारी केली. विद्यमान विजेते चेन्नई सुपरकिंग्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शनिवार दि. 26 रोजी स्पर्धेतील पहिली लढत होईल.
‘यंदा शनिवारची आयपीएल सलामी लढत विशेष महत्त्वाची असेल. या लढतीच्या निमित्ताने प्रेक्षक क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी स्टेडियमवर येत आहेत’, असे आयपीएल कार्यकारिणीने पत्रकातून नमूद केले.
यंदा आयपीएलमधील सर्व साखळी सामने मुंबई, नवी मुंबई व पुणे येथे होत असून त्यात कोव्हिड-19 प्रोटोकॉलनुसार 25 टक्के चाहत्यांना प्रवेश दिला जाईल, असे त्यांनी यात स्पष्ट केले.
यावर्षी 15 व्या आवृत्तीच्या आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपरजायंट्स व गुजरात टायटन्स या दोन नव्या संघांची भर पडली असून हंगामात 74 सामने खेळवले जाणार आहेत. या 74 पैकी 70 सामने मुंबईतील वानखेडे व ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील ग्राऊंड व पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर होतील.
आयपीएल साधारणपणे वर्षभराच्या ब्रेकनंतर होत आहे. यापूर्वी 2021 मध्ये भारतातील काही ठिकाणी बंदिस्त स्टेडियममध्ये आयपीएलचे थोडे सामने पार पडले. पण, मे मध्ये अचानक बायो-बबलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ही स्पर्धा मध्यातच थांबवावी लागली. त्यानंतर उर्वरित सर्व सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये खेळवले गेले. त्यापूर्वी 2020 मधील आयपीएल स्पर्धा पूर्णपणे युएईमध्येच झाली होती.
यंदाच्या आयपीएलसाठी बुधवारपासून तिकीटविक्री सुरु झाली असून साखळी फेरीतील सामन्यांची तिकीटे अधिकृत वेबसाईट www.iplt20.com आणि www.BookMyShow.com या साईटवरुन खरेदी करता येणार आहेत, असे आयपीएल कार्यकारिणीने जाहीर केले.

सुरेश रैना आयपीएलमध्ये समाविष्ट, मात्र समालोचक म्हणून!
आयपीएलमध्ये गाजवलेली हुकूमत पाहता ‘मिस्टर आयपीएल’ अशी ओळख प्राप्त झालेल्या डावखुऱया सुरेश रैनाचे यंदा आयपीएलमध्ये पुनरागमन होत आहे. मात्र, खेळाडू म्हणून नव्हे तर समालोचक म्हणून तो या स्पर्धेत कार्यरत असेल. केवळ सुरेश रैनाच नव्हे तर पीयूष चावला, धवल कुलकर्णी व हरभजन सिंग हे खेळाडू देखील यंदा समालोचन पथकात पदार्पण करत आहेत.
15 व्या आवृत्तीच्या आयपीएल स्पर्धेत 85 समालोचक निवडले गेले असून इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, मल्याळम, बंगाली व प्रथमच गुजराती भाषेत सामन्यांचे धावते समालोचन केले जाणार आहे. यंदा गुजरात टायटन्स हा नवा संघ जोडला गेला असून या पार्श्वभूमीवर प्रथमच गुजरातीमध्ये धावते समालोचन होईल. ही जबाबदारी प्रसिद्ध रेडिओ निवेदक धवनित ठकेर यांच्यासह नयन मोंगिया व मनप्रीत जुनेजा यांच्याकडे सोपवली गेली आहे.

रवी शास्त्रींचेही पुनरागमन
भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांचेही यंदाच्या आयपीएलच्या माध्यमातून समालोचन क्षेत्रात पुनरागमन होत आहे. मयंती लँगर बिन्नी देखील 2 वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा ब्रॉडकास्ट टीममध्ये झळकणार आहे.
स्टार स्पोर्ट्स, डिज्ने प्लस, हॉटस्टारसाठी समालोचक, निवेदक
वर्ल्ड फीड ः हर्षा भोगले, सुनील गावसकर, एल. शिवरामकृष्णन, मुम्पेलो मंगवा, इयान बिशप, ग्रॅहम स्मिथ, ग्रॅहम स्वॅन, केविन पीटरसन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोप्रा, डॅनिएल मॉरिसन, मॉर्नी मॉर्कल, सायमन डूल, मॅथ्यू हेडन, निकोलस नाईट, रोहन गावसकर, ऍलन विल्किन्स, डब्ल्यू व्ही रमण, डॅरेन गंगा.
हिंदी व इंग्रजी ः जतिन सप्रू, मयंती लँगर बिन्नी, तान्या पुरोहित, अनंत त्यागी, नेरोली मेडोज, सुरेन सुंदरम, आकाश चोप्रा, निखील चोप्रा, इरफान पठाण, हरभजन सिंग, रवी शास्त्री, सुरेश रैना, पीयूष चावला, मोहम्मद कैफ, धवल कुलकर्णी.
तामिळ ः भावना बाळकृष्णन, मुथूरामन आर., राधाकृष्णन श्रीनिवासन, केव्ही सत्यनारायणन, आरजे बालाजी, विष्णू हरिहरन, एस. बद्रिनाथ, अभिनव मुकुंद, के. श्रीकांत, योमहेश विजयकुमार, आर. सतीश, रसेल ऍरनॉल्ड.
तेलुगू ः विंध्या विशाका एम., एम. आनंद श्रीकृष्ण, कौशिक एनसी, आर. श्रीधर, एमएसके प्रसाद, वेणुगोपालराव यलका, कल्याण कृष्णा, कल्याण कोल्लरपू, आशिष रेड्डी, टी. सुमन.
कन्नड ः मधू मैलनकोडी, रिना डिसोझा, किरण श्रीनिवास, सुमेश गोनी, श्रीवास मूर्ती पी., विजय भारद्वाज, भरत चिपळी, अखिल भालचंद्र, पवन देशपांडे, वेंकटेश प्रसाद, वेदा कृष्णमूर्ती.
मराठी ः कुणाल दाते, प्रसन्न संत, चैतन्य संत, स्नेहल प्रधान, विनोद कांबळी, संदीप पाटील, अमोल मुझूमदार.
बांगला ः संजीब मुखेर्जा, आरआर वरुण कौशिक, सरदिंदू मुखर्जी, जॉयदीप मुखर्जी, सौराशिष लाहिरी.
मल्याळम ः विष्णू हरिहरन, श्रीयस मोहम्मद, टिनू योहानन, रैफी गोमेझ, सीएम दीपक.
गुजराती ः करण मेहता, मनन देसाई, धवनित ठकेर, आकाश त्रिवेदी, मनप्रीत जुनेजा, नयन मोंगिया.

चेन्नईचा मोईन अली सलामी लढतीतून बाहेर
विद्यमान विजेत्या चेन्नई सुपरकिंग्स संघातील अष्टपैलू मोईन अली आयपीएल सलामी लढतीसाठी उपलब्ध असणार नाही. इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूला अद्याप भारताचा व्हिसा मिळालेला नसून यामुळे त्याला आपला प्रवासही लांबणीवर टाकावा लागला आहे. मोईन अली अगदी गुरुवारपर्यंत भारतात आला तरी 3 दिवस सक्तीच्या क्वारन्टाईनमुळे शनिवारच्या लढतीत तो खेळू शकणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.
‘आम्ही याबाबत सातत्याने बीसीसीआयच्या संपर्कात असून येत्या एक-दोन दिवसात मोईनला व्हिसा मिळेल, अशी अपेक्षा आहे. तो अद्याप संघात दाखल होऊ शकलेला नाही, हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे. पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंसाठी स्वतंत्र प्रक्रिया असते. हे यामागील कदाचित कारण असू शकते’, असे चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन म्हणाले.
मोईन अलीचे आजोबा पाकव्याप्त काश्मीरमधून इंग्लंडला स्थलांतरित झाले होते. मोईनचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून विविध कारणांनी तो सातत्याने भारतात येत राहिला आहे. चारवेळा आयपीएल चॅम्पियन्स राहिलेले चेन्नई सुपरकिंग्स आपल्या सलामी लढतीत केकेआरविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
मागील आयपीएलमध्ये मोईन अलीचे योगदान
सामने / केलेल्या धावा / बळी
15 / 357 / 15

शुभमन गिल म्हणतो, आयपीएल गाजवले तरच टी-20 वर्ल्डकपमध्ये संधी!
मुंबई ः ऑस्ट्रेलियातील आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये दर्जेदार कामगिरी आवश्यक असल्याचे शुभमन गिलने म्हटले आहे. शुभमन गिल यंदा गुजरात टायटन्स या पदार्पण करत असलेल्या संघाकडून खेळणार आहे. मागील आयपीएलमध्ये त्याचा केकेआर संघात समावेश होता. युवा पिढीतील आश्वासक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱया गिलने आतापर्यंत 58 आयपीएल सामने खेळले आहेत.
‘यंदा जेतेपदावर आपली मोहोर उमटवण्याची जितकी अन्य संघांना संधी आहे, तितकीच आम्हाला देखील आहे. यंदा सर्व आघाडय़ांवर अव्वल असे खेळाडू आमच्या संघात उपलब्ध आहेत. अव्वल फलंदाज, सरस गोलंदाज आणि दर्जेदार क्षेत्ररक्षकांमुळे आमचे आव्हान तगडे असेल’, असे शुभमन याप्रसंगी म्हणाला.
यंदा गुजरात संघाचे नेतृत्व हार्दिक पंडय़ाकडे असून कर्णधार या नात्याने पंडय़ासाठी ही पहिलीच आयपीएल असणार आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहरा मुख्य प्रशिक्षक व गॅरी कर्स्टन फलंदाजी प्रशिक्षकपदी कार्यरत असतील.
गुजरात टायटन्सचा संघ आयपीएलमधील आणखी एक पदार्पणवीर संघ लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध दि. 28 मार्च रोजी आपला पहिला सामना खेळेल. हार्दिक पंडय़ा व केएल राहुल हे दोन्ही खेळाडू यानिमित्ताने आमनेसामने भिडणार आहेत. यंदा आयपीएलमधील 10 संघ दोन गटात विभागले गेले असून गुजरात टायटन्सचा चेन्नई, हैदराबाद, आरसीबी, पंजाब व लखनौसह ब गटात समावेश आहे.

मुंबईत होम ग्राऊंडचा कोणताही लाभ नसेल ः रोहित शर्मा
यंदा आयपीएलमधील बहुतांशी साखळी सामने मुंबईत खेळवले जात असले तरी आपल्या संघातील बरेच खेळाडू नवे असल्याने घरच्या मैदानावर खेळण्याचा फारसा कोणताही लाभ नसेल, असे निरीक्षण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नोंदवले.
‘लिलावात करारबद्ध खेळाडू पाहिले तर संघाला नवे रुप मिळाले आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. सध्याच्या संघातील 70 ते 80 टक्के खेळाडू यापूर्वी मुंबईत फारसे खेळलेले नाहीत. केवळ मी, सूर्यकुमार यादव, केरॉन पोलार्ड, इशान किशन, जसप्रित बुमराह असे मोजकेच खेळाडू मुंबईत अधिक खेळलो आहोत. अगदी आम्ही सर्व जणही मागील दोन वर्षात मुंबईत एकही सामना खेळू शकलेलो नाही’, याचा रोहितने पुढे उल्लेख केला.
डेव्हाल्ड ब्रेविस ठरणार सरप्राईज पॅकेज?
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने डेव्हॉल्ड ब्रेविसची मुक्तकंठाने प्रशंसा केली असून यामुळे डेव्हॉल्डला आघाडी फळीत फलंदाजीला पाठवले जाणार का, याची यंदा उत्सुकता असेल. ‘आम्ही अद्याप आघाडी फळी निश्चित केलेली नाही आणि इतक्यात याबद्दल काही सांगणे घाईचे ठरेल. पण, डेव्हॉल्डची नेट्समधील फलंदाजी लक्षवेधी आहे. त्याच्यात उत्तम गुणवत्ता आहे’, असे जयवर्धने याबद्दल बोलताना म्हणाले









