लाइव्ह आरतीमध्ये करता येणार दर्शन
वृत्तसंस्था / जम्मू
कोराना संकटामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदाही अमरनाथ यात्रा होणार नाही. यंदा देखील छडी यात्रेसह केवळ पारंपरिक स्वरुपाने पूजा केली जाणार आहे. तसेच भाविक घरबसल्यास आरती लाइव्ह पाहू शकतील. यासंबंधीचा निर्णय श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने घेतला आहे.
यंदाही हेलिकॉप्टरद्वारे यात्रा करविण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. यंदा केवळ छडी निघणार असून ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिनी पूजा होणार आहे. तर यापूर्वी एप्रिलमध्येच अमरनाथ गुफा मंदिरात दर्शनासाठी होणाऱया वार्षिक यात्रेच्या नोंदणीकरणाला रोखण्यात आले होते.
बालटाल आणि चंदनवाडी मार्गांनी होणाऱया वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी अनुक्रमे 1 आणि 15 एप्रिलपासून सुरू झाली होती. 56 दिवसांची ही यात्रा पहलगाम आणि बालटाल मार्गांनी 28 जूनपासून सुरू होणार होती आणि याचा समारोप 22 ऑगस्ट रोजी होणार होता.









