विवाह समारंभ लांबले अन् कार्यक्रमही थांबले; छायाचित्रकार अडचणीत
सागर लोहार / व्हनाळी
कोरोना संसर्गामुळे लग्नसराईतच सलग दुस-या वर्षीही सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. परिणामी, लग्नसमारंभ, इतर कार्यक्रमाला बंदी आली. त्यामुळे फोटोग्राफीलाही ब्रेक लागला. पर्यायाने त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे.
संचारबंदीचा छायाचित्रकारांवरही मोठा परिणाम झाला आहे. फोटो स्टुडिओ बंद, लग्न समारंभ, साखरपुडा, वास्तुशांती मुंज इ. कार्यक्रम काही पुढे ढकलले तर काही लग्न समारंभ, साखरपुडा व इतर कार्यक्रम आप्तस्वकीयांमध्येच आटोपते घेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. काळाप्रमाणे बदल आत्मसात करून काहींनी लाखो रुपयांचे अत्याधुनिक कॅमेऱ्यांची व्याजाने पैसे घेऊन खरेदी केली होती. परंतु, लग्नाच्या तिथी पुढे ढकलल्याने व काही लग्न आटोपते घेतल्याने याचा मोठा फटका छायाचित्रकारांना बसला आहे.
हा व्यवसाय पूर्वीसारखा एकट्याचा राहिलेला नाही. एलईडी वॉल, क्रेन, ड्रोन ऑपरेटर, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर,अशा प्रकारे संपूर्ण टीम एकमेकांवर अवलंबून असते. याचा फटका सर्वांना बसत आहे म्हणून छायाचित्रकारांसाठी शासनाने काहीतरी पॅकेज द्यावे, अशी मागणी छायाचित्रकारांकडून केली जात आहे. लग्न हंगामातून होणाऱ्या उलाढाली फोटोग्राफरच्या वार्षिक व्यवहारांचा पाया असतो, अशा स्थितीत लग्न हंगामालाच बसलेला फटका फोटोग्राफर बांधवांची आर्थिक घडी विस्कटविणारा ठरतो आहे.
लग्न हंगाम चांगला होऊन आर्थिक उलाढाल झाल्यावर कॅमेऱ्यासाठी गुंतवलेले पैसे वसूल होतील, अशी आशा बाळगून अनेक ग्रामिण व शहरी भागातील फोटोग्राफरांनी आॅर्डर घेण्यास सुरुवात केली. मात्र दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचे संकट कोसळून लॉकडाऊन व जमावबंदी सुरू झाली. यामुळे लग्न समारंभ थांबले. परिणामी हे सर्वच फोटोग्राफर व्यवसाईक अडचणीत सापडले. कॅमेरा व इतर साहित्यांसाठी उसनवारीने गुंतविलेले लाखो रूपये वसूल कधी व कसे होणार, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
सीझनच हातचा गेला…
या वर्षी मी पावणेदोन लाखांचा नवीन कॅमेरा घेतला. त्यासाठी खासगी कर्ज घेतले. परंतु, लॉकडाऊनमुळे लग्नाचा सीझनच गेला. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न पडला आहे. सर्व ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. सीझनच हातचा गेला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षभर तरी काम मिळणार नाही. –जगदीश वाडकर, फोटोग्राफर, व्हनाळी ता.कागल
छायाचित्रकारांना मदत करावी
अलीकडे मोबाइल फोटोग्राफीचा फटका व्यवसायाला बसत असताना रोजंदारी मिळणेही काहींसाठी अवघड बनलेय. याशिवाय दुकानाचे भाडे अनेकांना परवडत नाही. एकूणच विविध अडचणींना तोंड देत असतानाच आता कोरोनामुळे व्यवसाय जागेवरच थांबला आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव याच दिवसात वाढत चालला आहे. त्यामुळे घरातच थांबायचे आहे. सर्व व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. शासनाने काहीतरी दखल घेऊन सर्व व्यवसायिकांना, छायाचित्रकारांना मदत करावी. – जे.के. फोटो ,गोरंबे. ता.कागल









