400 हून अधिक मतदान केंदे
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका निवडणुकीसाठी मनपा प्रशासनाने जोरदार तयारी चालवली असून, 400 हून अधिक मतदान केंदे आहेत. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यासाठी तयारी सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी इव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) चा वापर केला जाणार आहे.
यापूर्वी निवडणुकीत मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर केला जात असे. बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान करण्याची प्रथा अत्याधुनिक यंत्रणेमुळे कालबाहय़ होत चालली आहे. महापालिका निवडणुकीत 2013 पासून ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात येत आहे. मतदार यादीत चाचपणीबरोबरच मतदान कसे होणार याची माहिती मतदार घेत आहेत. यावषीही ईव्हीएम मशिनवर मतदान होणार असून, यंदा दुसऱयांदा ईव्हीएम मशिनचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन उपलब्ध करण्यात येणार असून, महापालिका प्रशासनाने मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
मतदान केंद्रावरील प्रिसायडिंग ऑफिसरना प्रशिक्षण तसेच ईव्हीएम मशीनचे डी मॉनिटरिंग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिकेच्या 58 वॉर्डांमध्ये 400 हून अधिक मतदान केंदे आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची सूचना मनपाच्या अधिकाऱयांना देण्यात आली आहे. त्यामुळे हे कामकाज सुरू आहे.