उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
@ पुणे / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी ही परंपरेप्रमाणे पायी करण्याऐवजी मानाच्या दहा पालख्या या बसेसमधून पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी वाखरी येथून दीड किलोमीटरपर्यंत पालीस बंदोबस्तात पायी वारी जाणार आहे. पालखी प्रस्थान सोहळय़ाला मात्र आळंदी आणि देहू या ठिकाणी प्रत्येकी 100 जणांना, तर अन्य आठ ठिकाणी प्रत्येकी 50 वारकऱयांना उपस्थित राहता येणार आहे.
उपमुख्यमंत्री आणि जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला. पायी वारीला परवानगी द्यायची की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालावर कोरोना सद्यस्थितीच्या आढावा बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. गेल्या वषीही पायी वारीला परवानगी देण्यात आली नव्हती, तर पालखी प्रस्थान सोहळा 20 लोकांच्या उपस्थितीत झाला होता.
पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, पायी वारीला परवानगी देण्याऐवजी दहा मानाच्या पालख्या या वेगवेगळय़ा ठिकाणांहून बसेसमधून पंढरपूरला नेण्याचे ठरविण्यात आले आहे. प्रत्येक पालखीबरोबर दोन बसेस असणार आहेत. एका बसमध्ये 30 याप्रमाणे प्रत्येक पालखीसोबत 60 वारकरी सहभागी होणार आहेत. आळंदी आणि देहू या ठिकाणी पालखी प्रस्थान सोहळय़ाला प्रत्येकी शंभर वारकऱयांना, तर अन्य पालख्यांच्या ठिकाणी प्रत्येकी 50 जणांना उपस्थित राहता येणार आहे. संबंधित वारकऱयांना आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी लागणार आहे.
वारीवरून राजकारण करू नये
पायी वारीला परवानगी नाकारण्यात आल्यावर भाजपकडून टीका करण्यात येऊ लागली आहे. याबाबत पवार म्हणाले, ‘वारीवरून राजकारण करू नये. आम्हालाही वाटते की पायी वारी व्हावी; पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे.
वाखरी ते पंढरपूर पायी वारी
वाखरी येथून पंढरपूरपर्यंत सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पायी वारी नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. वेगवेगळय़ा ठिकाणांहून आलेल्या दहा पालख्या या वाखरी येथे एकत्र येणार आहेत. त्या पालख्यांबरोबर असणाऱयाच वारकऱयांना पायी वारीमध्ये सहभागी होण्यास परवानगी असणार आहे. वाखरी येथून पोलीस बंदोबस्तात पायी वारी जाणार आहे. त्या काळात या परिसरात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक किंवा अन्य नागरिकांना वारी मार्गावर येणे; तसेच वारीत सहभागी होण्यासाठी मनाई असणार आहे. पायी वारी जाण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे वारकऱयांकडून पायी वारीसाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा मध्यम मार्ग काढण्यात आला आहे’ अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
– पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद राहणार
– पालखी सोहळय़ात सहभागी होणाऱया वारकऱयांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक
– पालखी सोहळय़ातील वारकऱयांची यादी सबंधित पालखी संस्थानांना स्थानिक पोलिसांकडे द्यावी लागणार
– 19 जुलैला पालखी प्रस्थान सोहळा होणार
– वाखरी येथे 19 जुलैला सर्व मानाच्या पालख्या एकत्र येणार
– 20 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक पालखीसह पाच भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोडले जाणार
– 24 जुलैला पालख्या मूळ ठिकाणी मार्गस्थ होणार
– 18 ते 25 जुलै या कालावधीत चंद्रभागा नदीत स्थान करण्यास वारकऱयांना बंदी









