गत दोन वर्षांत कोरोनामुळे फटका : उत्पादक काजू विक्रीच्या चिंतेत : उत्पादनाला प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
कमी श्रमात अधिक उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱया काजू उत्पादनाला किरकोळ प्रमाणात प्रारंभ झाला आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे विक्रीचा यक्षप्रश्न उत्पादकांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे यंदा तरी काजूला योग्य भाव मिळेल का? या चिंतेत उत्पादक आहेत. आधीच वळिवाच्या पावसामुळे आणि बदलत्या हवामानामुळे काजू पिकावर परिणाम झाला आहे. त्यातच काजूच्या दराचा प्रश्न उत्पादकांसमोर आहे.
बेळगाव आणि खानापूर तालुक्मयात काजू क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. दरवषी मोठय़ा प्रमाणात उत्पादन होते. मागील काही वर्षात काजूचा दर प्रतिकिलो 90 रुपयांच्या पुढे गेला होता. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षांत काजू उत्पादकांसमोर विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काजूला योग्य भाव मिळेल, अशी आशा उत्पादकांना लागली आहे.
सीमा बंद झाल्याने काजू राहिली घरीच
तालुक्मयातील बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी, बडस, कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, बाकनूर, कुदेमनी, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे आदी भागात काजूचे उत्पादन होते. उत्पादित काजू बेळगुंदी आणि तुर्केवाडी ता. चंदगड येथील आठवडी बाजारात विक्री केली जाते. मात्र कोरोनामुळे दोन वर्षांत बाजार भरला नाही. त्यामुळे काजुच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, सीमा हद्दीवरील रस्ते बंद झाल्याने उत्पादकांना घरीच काजू ठेवावी लागली होती. मात्र यंदा बाजारपेठा सुरळीत झाल्याने काजूला योग्य भाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विशेषतः डोंगरभाग आणि लाल जमिनीत काजूचे उत्पादन घेतले जाते. अलिकडे काजूक्षेत्र वाढले आहे. त्यामुळे दरवषी उत्पादनातही वाढ होत आहे. मात्र उत्पादित काजू बियाणाला बाजारपेठ आणि योग्य भाव मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे काजुला बाजारपेठेबरोबर योग्य भाव मिळावा, अशी मागणी देखील उत्पादकांतून होत आहे.









