सभापतींनी घेतला आढावा
प्रतिनिधी /बेळगाव
डिसेंबरमध्ये सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱया विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रथमच वेबकास्टींगच्या माध्यमातून प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी दिली.
सोमवारी सभापतींनी सुवर्णसौधची पाहणी करून थेट प्रक्षेपणासंबंधी अधिकाऱयांची बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्रक्षेपणासाठी लागणाऱया सर्व सोयी, सुविधा पुरविण्याची सूचना आपण अधिकाऱयांना केली आहे. येत्या आठवडय़ाभरात सर्व कार्यालयांना पूर्ण प्रमाणात इंटरनेटची सुविधा पुरविण्याची सूचना सभापतींनी केली. नागरिकांना विधीमंडळाचे अधिवेशन पाहता यावे यासाठी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येत आहे. हे अधिवेशन व्यवस्थीतपणे पार पाडावे यासाठी अधिकाऱयांनी त्वरित कामे सुरू करावीत, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱयांना केली. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, विधानपरिषदेच्या सचिव महालक्ष्मी, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते संजीवकुमार हुलकाई, एनआयसी अधिकारी संजीवकुमार क्षीरसागर, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांच्यासह वेगवेगळय़ा खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 20 नोव्हेंबरच्या आत अधिकाऱयांनी सर्व तयारी पूर्ण करण्याची सूचना बसवराज होरट्टी यांनी दिली. यंदाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होणार आहे.









