रंगाच्या दरात 20 टक्के वाढ तर पिचकाऱयाही महागल्या
वार्ताहर/ कराड
कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर आज मंगळवारी रंगपंचमीचा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करता येणार असल्याने बालचमूमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र यावर्षी रंगाच्या दरात तब्बल 20 टक्क्यांची वाढ झाली असून चायनीज पिचकाऱया व फुग्यांची आवक घटल्याने पिचकाऱयांच्या किमती वाढल्या आहे. परिणामी यंदाच्या पंचमीला महागाईचा रंग लागल्याचे दिसत आहे.
गुरूवार 17 रोजी होळीचा सण झाल्यानंतर आज मंगळवारी रंगपंचमी साजरी होत आहे. लहानग्यांपासून मोठय़ांपर्यंत रंगपंचमीचा उत्साह असतो. रंगपंचमीसाठी बाजारपेठेत रंग व पिचकाऱयांचे स्टॉल लागले आहेत. लहानग्यांची रंग, पिचकाऱया व फुगे खरेदीसाठी गर्दी होत आहे. यावर्षी मात्र रंगपंचमीच्या साहित्याच्या दरात वाढ झाल्याने नागरीकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
रंगाच्या किमतीत यावर्षी सरासरी 20 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 60 रूपये प्रती किलो दराने विकला जाणाऱया नैसर्गिक रंगांची किंमत यावर्षी 80 ते 100 रूपये किलो आहे. 40 ते 60 रूपयांनी विकली जाणारी फक्की रंगाची पिशवी 80 रूपयाला आहे. 1300 रूपये किलो असणारा पाचशे टक्का 1600 रूपये तर 1800 रूपयांचा हजार टक्का 2400 रूपये दराने विकला जात आहे.
यावर्षी बाजारात पिचकाऱया व रंगपंचमीसाठी वापरल्या जाणाऱया फुग्याची टंचाई जणवत आहे. पिचकाऱया व फुगे प्रामुख्याने चीनमधून आयात होतात. यावर्षी मात्र केंद्र सरकारने चीनमधून आयात होणाऱया साहित्यावरील कर वाढवल्याने रंगपंचमीच्या साहित्याची कमी प्रमाणात आवक झाली असल्याचे व्यापाऱयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे होलसेल बाजारात पिचकाऱया व फुग्यांची टंचाई जाणवत असल्याने दर वाढल्याचे सांगितले जात आहे. सध्या बाजारात 20 रूपयांपासून 300 रूपयांपर्यंत पिचकाऱया विकल्या जात आहेत. तर फुग्यांच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत.








