‘विरोधकांचे धाबे दणाणल्याने तृणमूलविषयी अपप्रचार’
प्रतिनिधी /मडगाव
आपले वय आता 72 वर्षे झाले असून यंदाची विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची असल्याचे तृणमूल नेते व बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी सांगितले आहे. वार्का येथील आपल्या कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा करताना बाणावलीवासियांनी आपल्यामागे उभे राहून आपणास मतदान करून त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी, असे भावनिक आवाहन केले.
तृणमूल काँग्रेस ही पश्चिम बंगालची पार्टी म्हणून सध्या अपप्रचार चालविला आहे. काँग्रेस, भाजप व आम आदमी हे दिल्लीतून आलेले पक्ष बाहेरचे नव्हेत काय, असा सवाल आलेमाव यांनी उपस्थित केला. तृणमूल काँग्रेसने महिला, युवकांसाठीच्या योजनांसह जमीन मालकी हक्कसारख्या जनहिताच्या योजना पुढे आणल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांनी हा अपप्रचार चालविला आहे, असा दावा आलेमाव यांनी केला.
तृणमूलमध्ये प्रवेशासाठी पॅकेज मिळालेले नाही
आपणास तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतेही पॅकेज मिळालेले नाही आणि बाणावलीवासीय तसेच उर्वरित गोमंतकीयांना माहिती आहे की, चर्चिल यांच्या हाती रुपया आला, तरी त्यातील 75 टक्के वाटा लोकांना दान केलेला आहे. तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यावर त्वरित जाहीर केलेल्या योजना मार्गी लावेल. मुंडकारांना मालकी हक्क 250 दिवसांच्या आंत दिले जातील. यासाठी तृणमूल काँग्रेसला कौल द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी याच टक्कर देऊ शकतात आणि बंगालमध्ये त्यांनी ते करून दाखविले आहे, याचा पुनरुच्चार आलेमाव यांनी यावेळी केला.









