गणेश तलाव, कृष्णाघाटावर विसर्जनाची सोय
प्रतिनिधी/मिरज
प्रत्येकवर्षी अलोट उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात होणाऱ्या शहरातील गणेशोत्सवावर सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना संसर्गजन्य आजाराचे संकट असल्याने यावर्षीचा अनंत चतुर्दशीचा उत्सवही साध्या पध्दतीने होणार आहे. यामुळे यंदा ना मिरवणूक, ना ढोल-ताशा, ना स्वागत कमानी असणार आहेत. उद्या, रविवारी मिरज शहरातील 173 मंडळांच्या ‘बाप्पां’ना जड अंत:करणाने निरोप दिला जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा उत्सवही स्वागत कमानी आणि मिरवणुकांविनाच होणार आहे. उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही प्रचंड प्रमाणात तैनात करण्यात येणार आहे. तर, कृत्रिम कुंडात मुर्ती विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विसर्जन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यासाठी एकच फिरते जलकुंड, कृत्रिम तलाव आणि मुर्तिदान केंद्रे कार्यान्वित केले आहेत. गणेश तलाव, कृष्णाघाट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, गाडवे चौक, समतानगर, रमा उद्यान येथे कृत्रिम तलावाची सोय केली आहे. तर, याच ठिकाणी मूर्तीदानाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पाचवी, सातवी आणि नववीला अनेक भाविकांनी कृत्रिम तलावात विसर्जन केले. आज 10 व्या दिवशीही घरगुती गणेश मूर्तीचे या कृत्रित कुंडातच विसर्जन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंधही घातले आहेत. असे असले तरी सलग 10 दिवस भाविकांच्या उत्साहात कमतरता जाणवली नाही. सर्वत्र बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पांना जड अं:तकरणाने निरोप देण्यात येणार आहे. मात्र, प्रत्येकवर्षी अनंत चतुर्दशी दिसणारा उत्साह नाही.
Previous Articleशहरी भागात वॉर्डनिहाय लसीकरण
Next Article सातारा जिल्हा सर्वोत्कृष्ट घटक म्हणून घोषित








