ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासाठी प्रयत्न करणार असल्याची दिली माहिती
प्रतिनिधी / इचलकरंजी
येत्या महिनाभरात बांधकाम कामगारांप्रमाणेच यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. इचलकरंजी येथील दगडूलाल मर्दा मानवसेवा सभागृहात आज शुक्रवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामगार मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती दिली.
यावेळी पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त शैलेश पोळ, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार राजीव आवळे, मदन कारंडे, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांचा बांधकाम क्षेत्राबरोबरच त्याच्याशी निगडीत क्षेत्रातील कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.
यावेळी पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्यासह विविध मान्यवरांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना व त्यांच्या वारसांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. यावेळी क्रेडाई संस्थेचे नितीन धूत, मयूर शहा, भरमा कांबळे, दत्ता माने, आनंदा गुरव, राजेंद्र निकम यांच्यासह विविध बांधकाम कामगार संघटनांचे प्रतिनिधी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.